पंतप्रधानांचे नाव माहिती नसल्याने नववधूने लग्न मोडले, नवरा मंदबुद्धी असल्याचे म्हणत जाहीर अपमान

उत्तर प्रदेशातील गाजीपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नसीरपूर गावामध्ये नव्याने लग्न झालेल्या एका तरुणाला त्याच्या मेहुण्यांनी देशाचे पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारला होता. बराच विचार केल्यानंतरही त्याला या प्रश्नाचं उत्तर देता न आल्याने या तरुणाशी झालेलं लग्न नववधूने मोडून टाकलं. इतकंच नाही तर हा तरूण मंदबुद्धी असल्याचं म्हणत या नववधूने या तरुणाचा जाहीर अपमान केला. शिवशंकर राम असं या तरुणाचं नाव असून त्याचं लग्न ज्या तरुणीशी झालं होतं ती करंडा येथील बसंत पट्टीची रहिवासी आहे.

11 जूनला शिवशंकर याचं लग्न झालं होतं. लग्नाच्या दुसऱ्या दुवशी नववधूच्या बहिणी शिवशंकरसोबत गप्पा मारत होत्या. यावेळी त्या शिवशंकरला विविध प्रश्न विचारून त्याची मजा घेत होत्या. यावेळी नववधूच्या लहान बहिणीने शिवशंकर याला प्रश्न विचारला की देशाचे पंतप्रधान कोण ? यावर शिवशंकर याला उत्तर देता आलं नाही. शिवशंकर याचं सामान्य ज्ञान अगदीच सामान्य असल्याने नववधूच्या घरचे संतापले होते. त्यांनी जाहीरपणे शिवशंकर याला मंदबुद्धी म्हणत त्याचा अपमान करणं सुरू केलं. यात शिवशंकरची बायकोही सामील झाली आणि तिनेही शिवशंकरला वाईटसाईट बोलण्यास सुरुवात केली.

असं सांगितलं जात आहे की या सगळ्या प्रकारानंतर नववधूने शिवशंकरसोबतचं लग्न मोडलं आणि त्यानंतर पुन्हा वरात काढत या नववधूने शिवशंकरचे घर गाठत त्याच्या भावाशी लग्न केलं. शिवशंकरच्या वडिलांचं म्हणणं आहे की त्यांच्या लहान मुलाचं अजून लग्नाचं वयही झालेलं नाहीये. मात्र बंदुकीचा धाक दाखवत हे लग्न लावण्यात आलं. पोलिसांना या घटनांबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की याबाबत अद्याप कोणीही तक्रार केलेली नाहीये. मात्र एक तरुण पोलिसांकडे पंतप्रधानांचे नाव माहिती नसल्याने आपले लग्न मोडल्याची तक्रार घेऊन जरूर आला होता असं पोलिसांचं म्हणणं आहे.