लग्नाच्याच दिवशी नवरी मुलगी कुटुंबासोबत फरार!

एक विवाहेच्छुक तरुण, जवळ आलेली लग्नघटिका, वऱ्हाड नवऱ्या मुलीच्या घरासमोर आलेलं.. आणि त्या घराला घातलेलं मोठ्ठं कुलूप… कल्पना देखील करवणार नाही, अशी वेळ पंजाबमधील एका नवऱ्यामुलावर आली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, हरजिंदर सिंग यांच्यासोबत ही घटना घडली असून त्यांची वाग्दत्त वधू आणि तिचे कुटुंबीय लग्नाच्या दिवशीच फरार झाले आहेत.

हरजिंदर सिंग यांचा विवाह मोगा या गावातील एका तरुणीशी ठरला होता. जवळपास महिन्याभरापूर्वी लग्नाशी संबंधित सर्व बाबी पूर्ण झाल्या होत्या. लग्नाच्या एक दिवस आधी मुलीकडून होणारी शगुनची प्रथाही पार पाडण्यात आली होती.

लग्नाच्या दिवशी सकाळी जेव्हा वऱ्हाड निघालं तेव्हा वाटेत काही जणांनी त्यांचा रस्ता अडवला. रस्ता अडवून हरजिंदर याला संबंधित तरुणीचं आधीच कोर्ट मॅरेज झालं असून त्यावेळी ती अल्पवयीन असल्याने नवऱ्याला शिक्षा भोगावी लागल्याची माहिती दिली.

या घटनेमुळे संभ्रमावस्थेत असूनही वऱ्हाडाने थेट नवऱ्या मुलीचं घर गाठलं. पण, तिथे त्यांना आणखी एक धक्का मिळाला. नवऱ्या मुलीच्या घराला कुलूप लावलेलं होतं. नवऱ्या मुलीचा किंवा तिच्या कुटुंबीयांचा काहीच ठावठिकाणा नव्हता. हरजिंदरने मुलीला आणि तिच्या घरच्यांना फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही.

अखेर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी सिंह कुटुंबीयांची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या