भर मंडपात नवऱ्याने घेतले चुंबन, नवरीने केली पोलिसांत तक्रार

लग्न समारंभात भर मंडपात पैज लावण्यात आली होती, मात्र ही पैज नवऱ्याला चांगलीच महागात पडेल, याची त्याला कल्पनाही नव्हती. स्टेजवर सर्व पाहुण्यांसमोर नवऱ्याच्या वर्तनाचा वधूला इतका राग आला की, तिने सरळ पोलीस स्थानक गाठून नवऱ्याची पोलिसांत तक्रार दाखल केली.

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यामधील बहजोई पोलीस स्थानक परिसरात 26 नोव्हेंबरला मुख्यमंत्री सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यावेळी बदायू जिल्ह्यातील बिलसी गावातील एका तरुणाचा विवाह संभल पावसा येथील एका तरुणीशी झाला होता. लग्नानंतर 28 नोव्हेंबरला पावसा गावात वधू-वरांचा विधिवत विवाह सोहळा पार पडला. विवाहाचे सर्व विधि यथासांग पार पडल्यानंतर वर आणि वधू स्टेजवरील आसनांवर बसले होते. त्याच वेळी भर मंडपात 300 पाहुण्यांच्या उपस्थितीत वराने वधुचे चुंबन घेतले. वराच्या या अनपेक्षित वर्तनामुळे वधू अतिशय संतापली. ती स्टेजवरून उतरून एका खोलीत जाऊन बसली. कुटुंबियांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काही केल्या ऐकायला तयार होईना. सगळ्यांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती पुन्हा स्टेजवर जाण्यास तयार होईना.

नंतर तिने आपल्या कुटुंबियांसह बहजोई पोलीस स्थानक गाठले. वधूने बहजोई येथील स्टेशन प्रभारी पंकज लावनिया यांना वराने केलेल्या कृत्याबद्दल सांगितले. त्याच वेळी वर पक्षाकडील मंडळींनीही पोलीस ठाणे गाठले. तेथे वधूने सर्वांसमोर सांगितले, ‘मला आता याच्यासोबत राहायचे नाही. मी माझ्या घरी राहीन. मला त्यांचे वागणे आवडत नाही. जो माणूस 300 लोकांसमोर असे कृत्य करू शकतो, तो कसा सुधारेल. त्यामुळे या वाईट कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.’

वर पक्षानेही पोलीस स्थानकात त्यांची बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, वधूने वराशी पैज लावली होती. जर त्याने स्टेजवर सर्वांसमोर तिचे चुंबन घेतले तर ती त्याला 1500 रुपये देईल. जर तो हे करू शकला नाही तर त्याला वधूला 3000 रुपये द्यावे लागतील. याबाबत स्टेशन प्रभारी वधूशी बोलले असता तिने असे काही नसल्याचे सांगितले. त्याने वराशी कोणतीही अट ठेवली नव्हती.

या प्रकरणावरून पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांमध्ये वादावादी सुरूच होती. यानंतर दोन्ही पक्षांनी एक करार केला की, वधू आणि वर आता वेगळे राहतील. स्टेशन प्रभारी पंकज लावनिया यांनी सांगितले की, सध्या दोघांचे लग्न नोंदणीकृत आहे, त्यामुळे त्यांना घटस्फोट घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.