मुलांच्या लग्नाआधी व्याही विहिणीसोबत फरार

लग्न हे दोन जीवांपेक्षाही दोन कुटुंबांचं नातं अधिक असतं. एका लग्नामुळे दोन कुटुंब एकमेकांशी जोडली जातात. पण, अशाच दोन कुटुंबाना एकत्र आणणाऱ्या एका लग्नाआधी नवऱ्या मुलीची आई आणि नवऱ्या मुलाचे वडील एकमेकांसोबत फरार झाले आहेत.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमध्ये सूरत येथील काटरगाम गावात राहणाऱ्या एका तरुणाचा विवाह येत्या फ्रेबुवारीत नवसारीतील एका तरुणीशी होणार होता. लग्नाच्या एक महिना आधीच या तरुणीची आई बेपत्ता झाली. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. याच दरम्यान नवऱ्या मुलाचे वडीलही बेपत्ता झाले. त्यांच्याही कुटुंबीयांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना शोधायचा प्रयत्न सुरू केला.

मात्र, काही दिवसांनी त्या दोन्ही कुटुंबाना ते दोघे एकत्र पळून गेल्याची कुणकूण लागली. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल माहिती मिळवली. तेव्हा ते दोघंही खूप आधीपासून एकमेकांना ओळखत होते आणि तारुण्यात असताना त्यांना एकमेकांशी लग्न करायचं होतं, असं उघड झालं. त्यामुळे ते दोघंही एकत्रच पळून गेले असल्याची शक्यता कुटुंबीयांनी वर्तवली आहे. व्याही आणि विहिण होऊ पाहणारे दोन जण पळून गेल्याने त्यांच्या मुलांचं होऊ घातलेलं लग्न मोडलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या