प्रेमात आणि युद्धात…! नवरीची आई होणाऱ्या जावयाच्या वडिलांसोबत दुसऱ्यांदा फरार

2421

‘प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं’, ‘प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं’, हे फिल्मी डायलॉग तुम्ही हजारदा ऐकले असतील. प्रेम करणारी प्रेमीयुगुलं पळून गेल्याच्याही शेकडो घटना आपण पाहिल्या असतील. परंतु ठरलेले लग्न पार पडण्याआधी नवऱ्या मुलीची आई आणि नवऱ्या मुलाचे वडील फरार झाल्यास आश्चर्याचा धक्का बसतोच. त्यात हे दोघे एकदा नाही तर दोनदा पळून गेल्याचे कळाले तर मग कहरच म्हणावा लागेल. असाच एक प्रकार गुजरातमधील नवसारी येथे घडला आहे.

काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये एक घटना घडली होती. एक ठरलेले लग्न पार पडण्याआधी नवऱ्या मुलीची आई आणि नवऱ्या मुलाचे वडील फरार झाले होते. सूरतमध्ये घडलेल्या या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. पळून गेलेले ते दोघे जण परतलेही होते. आता पुन्हा एकदा ते पळून गेल्याने दोघांच्याही कुटुंबीयांनी डोक्याला हात मारून घेतला आहे. चित्रपटाच्या पटकथेलाही मागे सोडणारा हा प्रकार गुजरातमधील नवसारी येथे घडला असून सूरत येथील नवऱ्या मुलाचे वडील आणि नवसारी येथील नवरी मुलीची आई पुन्हा बेपत्ता झाले आहेत.

43 वर्षीय हिम्मत पटेल आणि नवसारीची 42 वर्षीय शोभना रावल हे पहिल्यांदा 10 जानेवाराली पळून गेले होते. त्यानंतर दोन आठवड्यांनी परत आल्यानंतर ते पुन्हा एकदा 29 फेब्रुवारीला गायब झाले आहेत. सूरत याठिकाणी भाड्याच्या घरामध्ये राहत असल्याचे वृत्त आहे. गेल्या वेळेस कुटुंबीयांनी ते पळून गेल्यानंतर पोलिसांना माहिती दिली होती, मात्र यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात माहिती दिलेली नाही.

काय आहे नक्की प्रकार?
सूरत येथील काटरगाम गावात राहणाऱ्या एका तरुणाचा विवाह नवसारीतील एका तरुणीशी होणार होता. लग्नाच्या एक महिना आधीच म्हणजे 10 जानेवारी रोजी या तरुणीची आई बेपत्ता झाली. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. याच दरम्यान नवऱ्या मुलाचे वडीलही बेपत्ता झाले. त्यांच्याही कुटुंबीयांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना शोधायचा प्रयत्न सुरू केला. काही दिवसांनी त्या दोन्ही कुटुंबाना ते दोघे एकत्र पळून गेल्याची कुणकूण लागली. दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल माहिती मिळवली. तेव्हा ते दोघेही खूप आधीपासून एकमेकांना ओळखत होते आणि तारुण्यात असताना त्यांना एकमेकांशी लग्न करायचे होते, असे उघड झाले. व्याही आणि विहिण होऊ पाहणारे दोन जण पळून गेल्याने त्यांच्या मुलांचे होऊ घातलेले लग्न मोडले.

आपली प्रतिक्रिया द्या