पावसापूर्वी मुंबईकरांना मिळणार गुळगुळीत रस्ते, पुलांची डागडुजी अंतिम टप्प्यात

सामना ऑनलाईन, मुंबई

शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी रस्त्यांची विविध कामे तसेच पुलांच्या सपाटीकरणाची कामे अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्प रस्ते आणि रस्तेदुरुस्तीची कामे १५ मेपर्यंत पूर्ण होणार असून तब्बल ३० पुलांच्या सपाटीकरणाचेही काम पालिकेने हाती घेतले आहे. मेअखेरपर्यंत ३० पूल वाहतुकीसाठी गुळगुळीत होणार आहेत.

पावसाळ्यात सर्वसामान्यांना खड्डे आणि खडबडीत रस्त्यांचा सामना करावा लागू नये म्हणून पालिकेने मोठ्या प्रमाणावर रस्तेदुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. या सर्व कामांवर देखरेख ठेवणाऱ्या परिमंडळ उपायुक्त आणि प्रमुख अभियंते यांची आज पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी विशेष बैठक बोलावली होती. रस्त्यांची कामे जसजशी पूर्ण होतील तसतसे त्या-त्या ठिकाणचे न वापरलेले बांधकाम साहित्य, राडारोडा आणि संरक्षक कठडे(बॅरिकेड्स) हे तातडीने उचलण्याचे व संबंधित रस्ते वाहतुकीसाठी त्वरित खुले करण्याचे आदेश आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान दिले.

३० पूल होणार गुळगुळीत
शहरातील एकूण ३० पुलांच्या सपाटीकरणाचेही काम हाती घेण्यात आले असून यापैकी २८ पुलांची कामे १५ मेपर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती प्रमुख अभियंता (पूल) एस. ओ. कोरी यांनी बैठकीत दिली. यामध्ये मुंबई सेंट्रल स्टेशनजवळील बेलासिस पूल व डायना पूल, करी रोड पूल, हिंदमाता पूल, चिंचपोकळी पूल, परळ पूल, शीव रुग्णालयाजवळील पूल, गोवंडी पूल, पी दक्षिण विभागातील वीर सावरकर पूल आदी पुलांचा समावेश आहे. तर जीजामाता भोसले उद्यान ते परळ या दरम्यान असणारा २.३८ किमी लांबीचा लालबाग पूल (परळ पूल) आणि सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवरील ‘डबल डेकर’ पद्धतीचा २.५५ किमी लांबीचा पूल या दोन्ही पुलांवरील रस्त्याच्या सपाटीकरणाचे काम हे ३१ मेपर्यंत पूर्ण होईल, अशीही हमी कोरी यांनी आजच्या बैठकीत दिली.

रस्त्यांची कामे १५ मेपर्यंत पूर्ण होणार
सध्या विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामध्ये पूर्णपणे नव्याने बांधण्यात येणाऱ्या ५८३ प्रकल्प रस्त्यांचा समावेश आहे. तर ‘प्राधान्यक्रम -१’ अंतर्गत ११० रस्त्यांची कामे तर ‘प्राधान्यक्रम – २’ अंतर्गत ९३८ रस्त्यांचे सपाटीकरण करण्यात येणार आहे. ९३८ रस्त्यांपैकी ४६९ रस्त्यांची कामे ‘मे २०१७’ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही यापूर्वीच देण्यात आले आहेत. हमी कालावधीअंतर्गत असणाऱ्या ८२ रस्त्यांची कामेदेखील १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या