वांद्रे, वरळी, फोर्टमध्ये पालिकेचे भूमिगत पार्किंग; रोबो, शटल पार्किंग सिस्टीम राबवणार

मुंबईत बेकायदा पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आता वांद्रे, वरळी, फोर्टमध्ये भूमिगत पार्किंगची सुविधा केली जाणार आहे. या ठिकाणी रोबो आणि शटल पार्किंग सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईत दररोज वाढणारी वाहनांच्या संख्येमुळे पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. मुंबईचा नागरी आणि औद्योगिक विकास झपाटय़ाने होत असताना दिवसाला शेकडो गाडय़ांची भर पडत आहे. मात्र ही वाहने पार्क करणार कुठे? असा प्रश्न निर्माण होतो. पार्किंगसाठीच्या खासगी जागांसह पे अॅण्ड पार्किंग आणि पालिकेची उपलब्ध 32 वाहनतळे यासाठी अपुरी पडतात. या पार्श्वभूमीवर पालिकेने वाहनतळांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुंबईत सद्यस्थितीत 40 ते 45 लाख वाहने आहेत.

या ठिकाणी होणार पार्किंग
– वांद्रे पश्चिम पटवर्धन पार्क उद्यान, बालगंधर्व रंगमंदिराच्या उत्तर बाजूकडे बहुमजली इलेक्ट्रिकल कार पार्पिंग (शटल आणि रोबो पार्पिंग) नियोजन, आरेखन, बांधकामासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत.
– कुलाबा ‘ए’ विभागात फ्लोरा फाऊंटन (हुतात्मा चौक) येथील अप्सरा पेन शॉपसमोरील वाहतूक बेटात आणि जी दक्षिण वरळी प्रभागामधील डॉ. ई. मोझेस रोड, वरळी जवळ भूमिगत वाहनतळ उभारले जाणार आहे.

शहिदांच्या वारसांना कामे
पार्किंग चालवण्याचे कंत्राट संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील शहिदांच्या वारसांना देण्यात येणार आहे. पार्किंग व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान, पार्किंग व्यवस्थेतून पालिकेला सुमारे 1 कोटी 24 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे.