ब्रिजभूषण सिंहांवर लैंगिक शोषणाचे आरोप; हिंदुस्थानी कुस्तीपटूंनी महासंघाविरुद्ध ठोकला शड्डू, जंतरमंतरवर धरणे आंदोलन

ऑलिम्पिकसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविणाऱ्या हिंदुस्थानी कुस्तीपटूंनी आता मनमानी कारभार करणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती महासंघाविरोधातच शड्डू ठोकलाय. महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि कुस्ती प्रशिक्षक हे अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप या कुस्तीपटूंनी केल्याने क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आशा ऑलिम्पियनसह देशातील अनेक अव्वल कुस्तीपटू राष्ट्रीय महासंघाच्या मनमानी कारभाराविरुद्ध दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलनासाठी बसले आहेत.

या सर्व कुस्तीपटूंनी राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर हुकूमशाहीचा आरोप केला आहे. कुस्तीपटूंनी त्यांच्या तक्रारी किंवा त्यांच्या मागण्यांचा नेमका तपशील शेअर केलेला नाही, मात्र ब्रिजभूषण शरण सिंह ज्याप्रकारे राष्ट्रीय महासंघ चालवत आहेत, त्यामुळे आम्ही कंटाळलो आहोत. महासंघ आम्हाला डावलण्याचा प्रयत्न करत असते. देशासाठी पदक जिंकूनही आम्हाला हक्काचा मान मिळत नाही, असे या कुस्तीपटूंचे म्हणणे आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे 2011 पासून राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असून फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांची सलग तिसऱ्यांदा महासंघाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.

बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिक, सरिता मोर, संगीता फोगट, सत्यवर्त मलिक, जितेंद्र किन्हा, सुमित मलिक, अमित धनखड, सुजीत मान, सोमबीर राठी, राहुल मान, अंशू मलिक व सत्यव्रत कादयान आदी 30 कुस्तीपटू हातात तिरंगा ध्वज घेऊन राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या आंदोलनात सहभागी झाले.

मला जीवे मारण्याची धमकी -विनेश फोगाट

टोकियो ऑलिम्पिकमध्ये मी अपयशी ठरले म्हणून राष्ट्रीय महासंघाच्या अध्यक्षांनी माझे नाव ‘खोटा शिक्का’ असे ठेवलेय. ऑलिम्पिकमध्ये आमच्याबरोबर फिजियो व प्रशिक्षक नव्हते. प्रशिक्षक हे अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचा लैंगिक शोषण करत आहेत. मी दहा वर्षांपासून फेडरेशनला आमच्या समस्यांविषयी आवाज उठविण्याचा प्रयत्न करतेय, मात्र आमचा आवाज दाबला जातोय. यांच्या परवानगीशिवाय येथील कुस्तीपटूंना पाणीही पिता येत नाही.

आंदोलनाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही – बजरंग पुनिया

आमचा हा लढा राष्ट्रीय कुस्ती महासंघाविरुद्ध आहे. त्यांच्या हुकूमशाही आणि मनमानी कारभाराविरुद्ध आहे. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. आम्ही कोणत्याही नेत्याला येथे बोलावले नाही. जंतरमंतरवर निदर्शने करणारे सर्व 30 जण हे कुस्तीपटू आहेत.  कुस्ती महासंघातील पदाधिकाऱ्यांना या खेळातील काही कळत नाही. आम्ही खूप दिवस यांचा त्रास सहन केला, आम्हा सर्व कुस्तीपटूंची पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी गंभीर विषयात लक्ष घालून आम्हाला मदत करावी.

 कुस्तीपटूंच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलोय – विनोद तोमर

राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर हे आंदोलक कुस्तीपटूंना भेटण्यासाठी जंतरमंतरवर आले होते. ते म्हणाले, ‘हे काय आहे ते माहीत नाही. कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रावरून आम्हाला कळले की, काही कुस्तीपटू आंदोलनास बसले आहेत. मी त्यांना त्यांच्या समस्या विचारण्यासाठी आलो आहे. एकदा ते फेडरेशनमध्ये आले की, सर्व प्रश्न सोडवले जातील.’