काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राहुल गांधी यांचा मास्टर प्लॅन

काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि संघटन भक्कम करण्यासाठी राहुल गांधी यांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि त्याला राहुल गांधी यांनीही होकार दिला आहे, अशी माहिती राहुल गांधींच्या भेटीनंतर मुंबईत परतलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिली.

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि संघटन भक्कम करण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये असला तरी येत्या काळात होणाऱया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास राहुल गांधी यांनीही होकार दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षासाठी मी एक स्वप्न पाहिलं आहे. काँग्रेसला राज्यात एक नंबरचा पक्ष बनवायचे आहे. यासाठीच राहुल गांधी यांनी मास्टर प्लॅन दिला असून त्यावर आम्ही सगळे मिळून काम करणार आहोत, असे पटोले यांनी सांगितले.

लोकसभा, विधानसभा निवडणुकांबाबत आताच काही सांगता येत नाही

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसोबत लढणार? असे विचारले असता नाना पटोले यांनी सावध प्रतिक्रिया दिली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका तीन वर्षांनंतर होणार आहेत. त्यामुळे आताच त्यावर काही सांगता येणार नाही आणि याबाबत जो काही निर्णय असेल तो आमच्या हायकमांडकडून घेतला जाणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या