दिग्गजांकडून ‘सॅल्यूट’, टीम इंडियाच्या देदीप्यमान मालिका विजयानंतर चोहोबाजूंनी कौतुक

मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी क्रिकेट संघाने मंगळवारी ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आणि चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने खिशात टाकली. सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या हिंदुस्थानच्या या युवा ब्रिगेडवर चोहोबाजूंनी कौतुकांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी दैनिक ‘सामना’ने यावर टाकलेला दृष्टिक्षेप…

प्रत्येक सत्रात एक हीरो सापडला – सचिन तेंडुलकर

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कौतुक करताना म्हटले की, या मालिकेतील प्रत्येक सत्रात हिंदुस्थानला एक हीरो सापडला. जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडला तेव्हा एकजुटीने त्याचा सामना निर्भयपणे केला. निष्काळजीपणा दाखवला नाही. संयम, शांतता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दुखापत व अनिश्चिततेचे आव्हान परतवून लावले. कसोटी इतिहासातील सर्वोत्तम मालिका विजयांपैकी एक विजय मिळवला.

उल्लेखनीय विजय – सौरभ गांगुली

बीसीसीआयचा अध्यक्ष सौरभ गांगुली यानेही टीम इंडियाच्या खेळाडूंच्या कामगिरीवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. त्याने सोशल साइटवर टीम इंडियाचे अभिनंदन करताना म्हटले की, हा उल्लेखनीय मालिका विजय ठरलाय. ऑस्ट्रेलियात जाऊन अशा प्रकारे विजय मिळवला हे क्रिकेटच्या इतिहासात कायम लक्षात ठेवले जाईल. या विजयाची कोणत्याही आकडय़ांमध्ये तुलना करता येणार नाही. संघातील सर्वच जण खूप छान खेळले.

न्यू टीम इंडिया… घर में घुसके मारता है – वीरेंद्र सेहवाग

वीरेंद्र सेहवाग याने आपल्या आक्रमक शैलीत टीम इंडियाची स्तुती केली. सोशल साइटवर विजयी संघाचे कौतुक करताना तो म्हणाला, खुशी के मारे पागल. यह नई टीम इंडिया है… घर में घुसके मारता है… अॅडलेडमधील अपयशानंतर हिंदुस्थानच्या या युवा ब्रिगेडने आपल्याला मोठा आनंद दिला. वर्ल्ड कप जिंकणे हे स्पेशल आहे. पण याचसोबत हा कसोटी मालिका विजयही तेवढाच स्पेशल आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही अभिनंदन

ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानी संघाने मिळवलेल्या यशाने आम्हा सर्वांना खूप आनंद झाला आहे. या संपूर्ण मालिकेत हिंदुस्थानी संघाचे पॅशन दिसून आले. टीम इंडियाच्या खेळाडूंनी दाखवलेल्या दृढनिश्चय, धैर्य व निर्धाराचे खूप कौतुक आहे. टीम इंडियाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे कौतुक आणि अभिनंदन केले.

वेल डन टीम इंडिया – शरद पवार

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हिंदुस्थानच्या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, अविश्वसनीय विजयासाठी टीम इंडियाचे अभिनंदन. हिंदुस्थानी क्रिकेटमधील ही ऐतिहासिक घटना आहे. गॅबामध्ये ऑस्ट्रेलियाला 32 वर्षांनंतर धूळ चारली. वेल डन टीम इंडिया…

आपली प्रतिक्रिया द्या