इंग्लंडमध्ये इंधन संकट, पेट्रोल मिळत नसल्याने लोकांमध्ये हाणामारी

जगातील सधन आणि शक्तिशाली देशांपैकी एक असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या इंग्लंडमध्ये अभूतपूर्व इंधन टंचाई निर्माण झाली आहे. सुरुवातीला अनेकांना ही बातमी खोटी असल्याचं वाटलं होतं, मात्र हे सत्य आहे. इंग्लंडमधील 90 टक्के पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध नाहीये. ज्या पेट्रोल पंपावर ते उपलब्ध आहे, तिथे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या पेट्रोल पंपांवर तणावाची परिस्थिती निर्माण होताना दिसत असून तिथे मारहाणीची घटना घडायला लागल्या आहेत. यामुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन चिंतेत सापडले असून त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्याला पाचारण करण्याबाबत विचार करायला सुरुवात केली आहे.

इंग्लंडमध्ये पेट्रोल भरण्यावरून लोकांमध्ये हाणामारीला सुरूवात झाली असून, या घटना रोखण्यासाठी तिथले पोलीस असमर्थ ठरत आहेत. हीच स्थिती राहिली तर संपूर्ण इंग्लंडमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. इंधन टंचाईमुळे लोकं संतापलेली असताना जर हिंसाचार वाढायला लागला तर इंग्लंडमध्ये अराजक माजण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून सैन्याला नेमण्याबाबत तिथला सरकार विचार करत आहे.


View this post on Instagram

A post shared by Saamana (@saamanaonline)

टंचाई का निर्माण झाली?

इंधन टंचाईला इंग्लंडमधले ट्रक ड्रायव्हर्सची अनुपलब्धता जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे. इंधन वाहून नेणारे टँकर चालवण्यासाठी पुरेशा प्रमाणात ट्रक ड्रायव्हर उपलब्ध नसल्याने इंधन टंचाई झाल्याचं कळतं आहे. इंधनाच्या पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झाला असल्याने ते पेट्रोल पंपापर्यंत पोहचू शकत नाहीये. यामुळे जिथे पेट्रोल उपलब्ध आहे तिथे लोकांमध्ये ते मिळवण्यासाठी भांडणे व्हायला लागली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी इंग्लंड सरकारने परदेशी ड्रायव्हरना तात्पुरता व्हिसा देण्याबाबत विचार सुरू केला आहे. सरकारी योजनेनुसार किमान 5 हजार विदेशी ड्रायव्हरना तात्पुरत्या स्वरुपाचा व्हिसा देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की ही परिस्थिती ब्रेक्झिटमुळे निर्माण झाली आहे. सरकारने मात्र म्हटलंय की ही परिस्थिती कोरोना महामारीमुळे निर्माण झाली असून अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्याबाबत विचार सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या