नवलच ! बाराव्या वर्षी झोपलेल्या मुलीला नऊ वर्षाने जाग आली

जगभरात चित्रविचित्र घटना घडत असतात ज्यावर काहीवेळेला डॉक्टरांनाही नेमके निदान सापड़त नाही. अशीच एक घटना ब्रिटनमध्ये 150 वर्षांपूर्वी घडली आहे. बाराव्या वर्षापर्यंत सर्वसामान्य आयुष्य जगत असलेली मुलगी एके रात्री अशी झोपली की नऊ वर्ष तिला जागच आली नाही. ही मुलगी ब्रिटनमध्ये चर्चेचा विषय बनली आणि जगभरातून लोकं या स्लिपिंग गर्लला पाहण्यासाठी येऊ लागले. मात्र तब्बल नऊ वर्षानंतर या मुलीला जाग आली.

मिडीअम डॉट कॉमच्या वृत्तानुसार, 15 मे 1859 मध्ये ब्रिटनमध्ये एलेन सॅडलर या स्लिपिंग गर्लचा जन्म झाला. या मुलीला 12 भावंड होती. तिचं कुटुंब ब्रिटनमध्ये टर्विले गावात राहतं. हे गाव ऑक्सफोर्ड आणि बकिंघमशायर च्या मध्ये आहे. एलेनच्या जन्माच्या वेळी सर्व काही आलबेल होतं. ती लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तिच्या आईने दुसरं लग्न केलं. 29 मार्च 1871 साली एलेन तिच्या भावंडांसोबत नेहमीप्रमाणे झोपली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले तरी ती उठली नाही. वेगवेगळ्या पद्धतीने तिला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती अजिबात हलली नाही. तिच्यावर पाणीही टाकले मात्र तरीही ती उठली नाही. त्यानंतर घरच्यांना वाटले ती मरण पावली. मात्र तिची पल्स सुरु होती त्यामुळे तिला तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरने पाहिले ती शीतनिद्रासारख्या स्थितीत गेल्याचे त्यांना सांगितले. मात्र त्याचे नेमके निदान त्यांना सापडत नव्हते. बरेच दिवस उलटूनही डॉक्टरांना नेमके निदान न सापडल्याने डॉक्टरांना शेवटपर्यंत तिला कोणता आजार आहे हे कळलेच नाही.

कालांतराने एलन ब्रिटनमध्ये चर्चेचा विषय झाली. तिची स्लिपिंग गर्ल म्हणून ओळख झाली. जगभरातील लोकं तिला कुतूहल म्हणून पाहायला यायचे. लोकं पैसे देऊन तिला उठवण्यासाठी परवानगी मागायचे. कुटुंबियही पैसे घेऊन त्यांना परवानगी द्यायचे. त्यामुळे तिच्या कुटुंबिय़ांचीही आर्थिक परिस्थिती सुधारत होती. मात्र एलनची झोप उडाली नाही. मात्र आपल्या मुलीला जिवंत ठेवण्यासाठी तिच्या आईने अनेक प्रयत्न केले. तिला लापशी, दूधाच्या माध्यमातून तिचे पोट भरायची. असे करता करता नऊ वर्ष लोटली आणि एकेदिवशी तिच्या आईचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आईच्या मृत्यूनंतर पाच महिन्याने एक चमत्कार झाला. 9 वर्ष झोपी गेलेली एलन अचानक जाग झाली. जेव्हा ती झोपली होती त्यावेळी ती 12 वर्षांची होती आणि जाग आली त्यावेळी ती 21 वर्षाची झाली होती. मात्र ते सुख पाहण्यासाठी तिची आई जिवंत नव्हती.