खलिस्तान समर्थकांवर कडक कारवाई करणार, ब्रिटनच्या खासदारांचा इशारा

लंडन येथील हिंदुस्थानी उच्चायुक्तालयावर हल्ला करत खलिस्तान्यांनी रविवारी हिंदुस्थानच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केला होता. या हल्ल्याचा तीव्र निषेध करत खलिस्तानी समर्थकांना अटक करून कारवाई करण्याचे आदेश ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी दिले आहेत. त्यांनी या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

बॉब म्हणाले की, खलिस्तानला समर्थन देणाऱ्यांमध्ये शीख समुदायातील काही मोजकी लोकं आहेत. या देशात वास्तव्य करणाऱ्या बहुतांश शीख नागरिकांचा खलिस्तान आणि त्यांच्या विचारधारेला विरोध आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. मी पोलिसांना सरळ शब्दांत थेट संदेश देऊ इच्छितो. जेव्हा रविवारसारखी परिस्थिती उद्भवेल तेव्हा खलिस्तानीच नव्हे तर त्यांच्या समर्थकांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कड कारवाई केली जाईल, असं बॉब यांनी स्पष्ट केलं आहे.

फुटीरवादी संघटना खलिस्तानचे समर्थक अमृतपाल सिंगला पंजाब पोलिसांनी फरार घोषित केले असून त्याच्या अटकेची कारवाई सुरू आहे. ही कारवाई रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये खलिस्तानी समर्थकांनी राडा घातला होता. रविवारी ब्रिटनमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तावर खलिस्तान्यांनी हल्ला करत तोडफोड केली. तसेच हिंदुस्थानी राष्ट्रध्वजाचा अपमान केला होता.