गर्लफ्रेंडकडे रोखून पाहिलं म्हणून हातच तोडला, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राडा

प्रेयसीकडे रोखून बघितल्याच्या कारणावरून एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राडा झाल्याचं वृत्त आहे. या घटनेत एका माणसाचा हात मोडला असून एकाचं नाकंही फुटलं आहे.

ही घटना तुर्कस्तानच्या अंटाल्या येथे घडली आहे. अंटाल्या शहरातील मुरतपासा येथे एक प्रसिद्ध फाईव्ह स्टार हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये काही ब्रिटीश आणि काही रशियन पर्यटक आले होते. त्यांच्या दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली.

या हॉटेलच्या गार्डनमध्ये हे दोन्ही गट होते. या दोन्ही गटांमध्ये मिळून 15 माणसं होती. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन गटांमध्ये अचानक हाणामारी सुरू झाल्याचं दिसत आहे.

त्यातल्या एका माणसाने दुसऱ्या माणसाच्या नाकावर ठोसा मारला. त्यानंतर जखमी माणसाच्या गटातील माणसं ठोसा मारणाऱ्यावर तुटून पडली. हां हां म्हणता या किरकोळ भांडणाचं राड्यात रुपांतर झालं.

काही वेळाने त्यांची ही मारामारी थांबवायला त्यांच्या कुटुंबातील महिला मध्ये पडल्या, त्या हॉटेलचे कर्मचारीही मध्ये पडले आणि त्यांनी हा राडा थांबवला. राडा थांबला तेव्हा लक्षात आलं की, यात एका माणसाचा हात मोडला आहे तर दुसऱ्याचं नाक फुटलं आहे. त्यांना हॉटेलतर्फे उपचार देण्यात आले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटीश नागरिक आपल्या प्रेयसीकडे रोखून बघत असल्याचा जाब तिथल्या एका रशियन नागरिकाने विचारला होता आणि त्यातूनच या वादाला तोंड फुटलं होतं. आता पोलीस या दोन्ही गटातील व्यक्तींचा शोध घेत असून अजून त्यातील कुणाचीही ओळख पटलेली नसल्याने कुणालाही अटक झालेली नाही.