ट्रुडोंचे पुरावे हे आधीच इंटरनेटवर उपलब्ध, ब्रिटीश कोलंबिया गव्हर्नरने कॅनडाच्या आरोपांची हवाच काढली

हिंदुस्थान आणि कॅनडामध्ये सुरू असलेला राजकीय वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. 18 जून रोजी कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामध्ये खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर याची हत्या झाली. या हत्येमध्ये हिंदुस्थानी एजंट्सचा सहभाग असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केला होता. मात्र, हे आरोप हिंदुस्थानने अमान्य केले होते. त्यानंतर आता ब्रिटीश कोलंबियाच्या गव्हर्नरने हिंदुस्थानची बाजू घेतली आहे.

जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपांनुसार, निज्जर याच्या हत्येत हिंदुस्थानी एजंट्सचा हात होता. त्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही ट्रुडो यांनी केला होता. त्यातील काही पुरावे त्यांनी सादरही केले होते. मात्र, हिंदुस्थानने ते पुरावे नाकारले होते. त्यात ब्रिटीश कोलंबियाचे गव्हर्नर डेव्हिड एबी यांच्या म्हणण्यानुसार ट्रुडो यांनी हिंदुस्थानविरोधात जे पुरावे सादर केले आहेत, ते आधीच इंटरनेटवर उपलब्ध आहेत.

सीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, निज्जर याच्या हत्येविषयी आपल्याला जे काही माहीत आहे, ते सार्वजनिक माहितीत उपलब्ध आहे. हे खूप निराशाजनक आहे. त्यांनी कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेकडून माहिती घेतली होती. मात्र, इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीखेरीज आपल्याला अन्य काहीही मिळालं नसल्याचं एबी यांचं म्हणणं आहे.