ब्रिटनच्या रेडिओवर बहरला मधुमास

शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट 30 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. केदार शिंदेंची लेक सनाने या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले. सनाने या चित्रपटात शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आजही या गाण्यावरील रील्स व्हायरल होत आहेत. देशातच नव्हे तर सातासमुद्रापार या गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. ब्रिटनमधील रेडिओलाही ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ पडली आहे.

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात शाहिरांची भूमिका साकारणारा अंकुश चौधरी याने यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘‘आपल्या मातीतल्या आपल्या मराठी गाण्याची भुरळ सातासमुद्रापार. ‘बहरला हा मधुमास…’ यूकेमधील आघाडीच्या सब्रास रेडिओवर 15 व्या क्रमांकावर वाजू लागलंय,’’ असे अंकुशने पोस्टमध्ये लिहिले आहे. अंकुशच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करून आनंद व्यक्त केला आहे. ‘‘मराठी पाऊल पडते पुढे…’’ असे म्हणत संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.