बहिणभावाची आखाड्यात दहशत

66

>>विठ्ठल देवकाते<<

ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीतील जोग व्यायामशाळेत महिलांच्या कुस्तीवर मेहनत घेणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच आणि प्रशिक्षक दिनेश गुंड यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. ते गेली काही वर्षे मुलींसाठी निवासी कुस्ती प्रशिक्षण केंद्र चालवत आहेत आणि तेदेखील कोणत्याही फीशिवाय. आपल्या स्वतःच्या मुलांनी पण कुस्तीत नाव कमवावे असा ध्यासच दिनेश गुंड यांनी घेतला होता. आपल्या वडिलांचे स्वप्न सत्यात उतरविताना मुलगी अंकिता व मुलगा आदर्श या सख्ख्या बहीणभावाने कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा पराक्रम केलाय. महाराष्ट्राच्या मातीत आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेली ही एकमेव बहीणभावाची जोडी आहे हे विशेष.

अंकिता व आदर्श यांच्या घरातच कुस्तीचा मोठा वारसा आहे. पंजोबा, आजोबा, वडील हे सर्व कुस्ती खेळायचे. त्यामुळे या बहीणभावाच्या रक्तातच कुस्ती आहे असेच म्हणावे लागेल, मात्र दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड दिल्याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करता येत नसते. अंकिता आणि आदर्श या बहीणभावाचा दिनक्रम भल्यापहाटे ४.३० पासून सुरू होतो.  ४.३० ते सकाळी ८ वाजेपर्यंत दोघेही व्यायाम करतात. दुपारी ११ ते १२.३० पर्यंत स्वीमिंग करायचे. मग संध्याकाळी ४ ते ७ या कालावधीत कुस्तीचा तांत्रिक सराव करायचा असा या बहीणभावाचा दिनक्रम चाललेला असतो. वडील दिनेश गुंड यांची या दोघांवरही करडी नजर असते. अंकिताने गेल्या वर्षी बँकॉक येथे झालेल्या आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. शिवाय या आधी दोन वेळा तिने या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले होते. जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेत अंकिताने तीन वेळा हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. याचबरोबर या रणरागिणीने राष्ट्रीय स्तरावर विविध वयोगटांत तब्बल १२ सुवर्णपदके जिंकली आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या प्रतिष्ठsच्या महाराष्ट्रातील सर्वोत्तम कुस्तीपटूच्या किताबानेही अंकिताचा गौरव करण्यात आला आहे. लहान भाऊ आदर्शनेही बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवून सलग चार राष्ट्रीय पदके जिंकण्याचा पराक्रम केलाय. गेल्या वर्षी जागतिक शालेय कुस्ती स्पर्धेत आदर्शने कास्यपदकाची कमाई केली होती. शिवाय गेल्या वर्षीच कुमार राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटाचे विजेतेपदकही आदर्शने पटकावले होते.

अंकिताचे

मिशन टोकियो ऑलिम्पिक

ऑलिम्पिक खेळणे हे कुठल्याही खेळाडूचे स्वप्न असते. त्यामुळे आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे नेतृत्व मला करायचे आहे. आतापासूनच मी त्यादृष्टीने सरावाला सुरुवात केली आहे. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकायचे हेच माझे मुख्य  स्वप्न आहे.

पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खेळणार

आदर्श गुंड अवघा १७ वर्षांचा असून त्याचे वजन ११० किलो आहे. आता पुढील वर्षी प्रतिष्ठsच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटात आपण उतरणार असल्याचा इशारा आदर्श गुंडने दिलाय. बदामाची थंडाई, प्रोटीन, उकडलेली अंडी, सिझनेबल फळे, मोड आलेली कडधान्ये असा आदर्शचा रोजचा खुराक असतो. किशोरवयात महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न या कुस्तीपटूने उराशी बाळगले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या