कोलमन भाऊ-बहिणीची मुसंडी

44
  • पहिल्यावहिल्या इंडियन ग्रां. प्री पॉवर बोट शर्यतीला दणदणीत प्रतिसाद
  • ‘दर्याचा राजा’ शर्यत कुलाब्याच्या कोळींनी जिंकली

सामना ऑनलाईन, मुंबई – मुंबईकरांनी गेले तीन दिवस ताशी १२० किलोमीटर वेगाने पाणी कापत धावणाऱ्या पी वन पँथर पॉवरबोटींचा सागरी थरार अनुभवला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या इंडियन ग्रां. पी या पॉवर बोट शर्यतीला क्रीडाप्रेमींचा दणदणीत प्रतिसाद लाभला. सॅम व डेझी या कोलमन भाऊ-बहिणीने ही शर्यत जिंकत आपले वर्चस्व दाखवून दिले. बलेनो आरएस बूस्टर जेटस् या बोटीमध्ये बसून शर्यतीत सहभागी होणाऱ्या कोलमन या युकेमधल्या भाऊ-बहिणीने ६० गुणांची कमाई करीत अव्वल क्रमांकावर मुसंडी मारली.

अमेरिकेचे क्रेग विल्सन व विल्यम एनरिक यांनी दुसरा तर युकेचेच जेम्स नॉर्विल व ख्रिस्तीयन यंग यांनी तिसरा क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडूंनी लॉएड डॉल्फिन्स तर तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडूंनी मनी ऑन मोबाईल मार्लिन्स बोट पाण्यामध्ये सुसाट नेत आपले लक्ष्य गाठले. ही जगातली पहिली अजिंक्यपद स्पर्धा असून त्याचे पहिले यजमानपद मुंबईला मिळाले आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष या स्पर्धेकडे लागून राहिले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने जॉय ऑफ वॉटर या संकल्पनेशी मुंबईकरांची ओळख करून देण्याचा मानस असल्याचे स्पर्धेचे आयोजक प्रोकॅम इंटरनॅशल संस्थेचे सहव्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग यांनी सांगितले.

युनियन मटोनॉटिक मॅनेजमेंट या पॉवरबोट स्पर्धांमधील जागतिक संस्थेच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या माध्यमातून सागरी जैवविविधतेचा संदेश देण्यात आला. ही स्पर्धा मुंबईनंतर इंग्लंड आणि अमेरिकेत होणार आहे. जगभरातील नामांकित स्पर्धा जिंकलेले बोटचालक आणि दिशा-मार्गदर्शक या स्पर्धेत सहभागी झाले. हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.

‘दर्याचा राजा’ स्पेशल शर्यत

कोळी बांधवांसाठी यावेळी ‘दर्याचा राजा’ या नावाने शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलाबा येथील कोळ्यांनी पहिला क्रमांक पटकावला. तसेच वर्सोवा व हाजी अली येथील कोळ्यांनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानांपर्यंत मजल मारली. विजेत्यावर एक लाख रुपयांचा वर्षाव करण्यात आला. दुसऱ्या स्थानावरील संघाला ६० हजार व तिसऱया स्थानावरील संघाला ४० हजार रुपये देण्यात आले.

दृष्टी संस्थेचा अप्रतिम आराखडा

दृष्टी या सामाजिक संस्थेने या शर्यतीची रूपरेषा ठरवली. समुद्रातील मार्ग व त्याचा आराखडा त्यांच्याकडून तयार करण्यात आला हे विशेष. जागतिक दर्जावरील या शर्यतीसाठी त्यांचेही मोलाचे योगदान लाभले.

आपली प्रतिक्रिया द्या