दारू सोडवण्यासाठीच्या औषधामुळे भावांचा मृत्यू, डॉक्टरविरोधात गुन्हा

27

सामना ऑनलाईन, परळी

दारू सुटावी यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या दोन भावांचा डॉक्टरने दिलेल्या भयंकर औषधामुळे मृत्यू झाला आहे. हदगांव शहरातील ही घटना असून परळी तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी असलेले संजय ज्ञानदेव मुंडे (वय-40) व विजय ज्ञानदेव मुंडे (वय-35) हे दोन सख्खे भाऊ डॉक्टर रविंद्र पोधाडे नावाच्या डॉक्टरकडे आले होते. या डॉक्टरने दिलेले औषध प्यायल्यानंतर अवघ्या काही तासात दोघांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मुंडे बंधू डॉ.पोधाडेने दिलेलं औषध त्याच्या क्लिनिकमध्येच प्यायले होते. औषध घेतल्यानंतर दोघांनाही अस्वस्थ वाटायला लागलं. डॉक्टरकडून निघाल्यानंतर तासाभरात दोघांना पोटात जळजळ व्हायला सुरुवात झाली आणि विचित्र वाटू लागले. सुरूवातीला संजय मुंडे यांना त्रास होत होता नंतर त्यांचा भाऊ विजय मुंडेंनाही हा त्रास सुरू झाला. या दोघांना लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दोघांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या नातेवाईकांनी लोहा उपजिल्हा रुग्णालय गाठले. या नातेवाईकांनी घडला प्रकार पोलिसांना कळवला. या दोघांचे मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले असून रविंद्र पोधाडेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या