चालता हो! मास्क न घालणाऱ्या जगविख्यात अभिनेत्याला दुकान कर्मचाऱ्यांनी सुनावले

फक्त हॉलीवूडच नाही तर बहुतांश जगाला ठावूक असेलल्या एका अभिनेत्याने बेजबाबदारपणाचं दर्शन घडवलंय.  कोरोना काळात संसर्ग टाळण्यासाठी मास्क घालणं आवश्यक असतानाही हा अभिनेता मास्कशिवाय फिरत होता. या अभिनेत्याच्या गळ्यामध्ये बँडाना होता ज्याचा वापर त्याला तोंड झाकण्यासाठी करता येऊ शकला असता, मात्र त्याने असं केलं नाही. मास्क नाही, प्रवेश नाही असं धोरण राबवणाऱ्या दुकानात शिरला ही या अभिनेत्याची मोठी चूक ठरली. त्याला मास्क घातला नसशील तर इथून चालता हो असं दुकानातील कर्मचाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.

फोटो सौजन्य-  https://pagesix.com/
फोटो सौजन्य- https://pagesix.com/

डाय हार्ड चित्रपटाच्या मालिकेमध्ये जगभरातील चित्रपटप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता ब्रूस विलीस राईट एड फार्मसी या दुकानात गेला होता. लॉस एंजलिस भागातील या दुकानात शिरण्यापूर्वी त्याला मास्क घाल असं सांगण्यात आलं होतं, मात्र त्याने मास्क घातलाच नाही.  मास्क न घालता तो या दुकानात शिरत असतानाचे त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया भागात कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला आहे.  लॉस एंजलिस हे या फैलावाचं केंद्रबिंदू ठरलं आहे. कॅलिफोर्नियामध्ये कोरोनामुळे 10 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे घाबरणारे असतानाही ब्रूस विलीसने कोरोनासंदर्भातील सूचनांकडे बिनधास्त दुर्लक्ष करणं त्याच्या असंख्य चाहत्यांनाही पटलेलं नाहीये.

ब्रूस हा त्याची बायको पूर्वाश्रमीची बायको डे मी मूर आणि मुलांसह इदाहो भागातील घरात राहायला गेला आहे. कोरोना काळात त्याने आपला वेळ त्याच घरात घालवला असल्याचं पेज सिक्सने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.  ब्रूस विलीस हा मेगन फॉक्ससोबत मिडनाईट इन द स्विचग्रास नावाच्या चित्रपटात भूमिका करणार आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचं काम बरंच लांबलं आहे.  याशिवाय ब्रूस विलीस कॉस्मिक स्पिन, अपेक्स, ऑऊट ऑफ डेथ, अमेरिकन सीज या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या