पंतप्रधानांचा अनादर केल्याने बीएसएफ जवानाचा पगार कापला

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनादर केल्याप्रकरणी एका बीएसएफ जवानाला अजब शिक्षा देण्यात आली आहे. संबंधित विभागाने त्याचा सात दिवसांचा पगार कापला आहे. पंतप्रधानांशी संबंधित चर्चेदरम्यान जवानाने त्यांच्या नावाचा उल्लेख करण्याआधी माननीय किंवा श्री असे आदरार्थी शब्द वापरले नाहीत. यामुळेच त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे. संजीव कुमार असे जवानाचे नाव आहे. तो पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील बीएसएफ मुख्यालयाच्या १५ व्या बटालियनमध्ये कार्यरत आहे.

२१ फेब्रुवारी रोजी झीरो परेडदरम्यान पंतप्रधानांबद्दल चर्चा करताना त्याने ‘मोदी प्रोग्राम’ असे म्हटले होते. यावर बटालियनचे कमांडिंग अधिकारी अनुप लाल यांनी आक्षेप घेतला होता. पंतप्रधानांच्या नावाचा उल्लेख करण्याआधी जवानाने आदरार्थी शब्द वापरणे आवश्यक होते. पण त्याने तसे न केल्याने हा पंतप्रधानांचा अपमान असल्याचं बीएसएफचं म्हणणं आहे, अशी माहिती लाल यांनी दिली. लाल यांच्या तक्रारीनंतर संजीवचा सात दिवसांचा पगार कापण्यात आला आहे.