‘अर्थसंकल्प’ नाही हा तर ‘भ्रमसंकल्प’, राष्ट्रवादीचा टिवटिवाट

43

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेमध्ये भाजप सरकारचा अखेरचा लोकसभा निडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी हा ‘अर्थसंकल्प’ नाही तर ‘भ्रमसंकल्प’ असल्याची टीका केली आहे.

मोदी सरकारने २०१९च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प सादर केला आहे. देशातील जनतेने काल चंद्रग्रण पाहिले आणि सरकारने आज अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिवसा तारे दाखवले, असे ट्वीट राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी केले आहे. तसेच हे सरकार मूठभर भांडवलदारांचे सरकार असून सामान्य नागरिकांसाठी काहीच करत नाही. देशाची आर्थिक शिस्त बिघडली आहे. आजच्या अर्थसंकल्पामुळे सेन्सेक्स पडला. या अर्थसंकल्पात मध्यवर्गीयांसाठीही काही झाले नाही. समाजातील कोणत्याच घटकाला ठोस काही मिळालेले नाही. जनता या सरकारवर नाराज आहे त्यामुळे यांना नक्कीच येत्या निवडणुकांमध्ये जागा दाखवेल, असे तटकरे यांनी म्हटले. सरकारने दर वर्षी २ कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या साडे तीन वर्षांत या सरकारने ते आश्वासन पूर्ण केले नाही. या सरकारचा फोलपणा आता समोर आला आहे, अशी टीका तटकरे यांनी केली.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही अर्थसंकल्पाबाबत ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांना उत्पादनावर दीड पट भाव मिळवून देण्याचे आश्वासन ४ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्ण करता आले नाही. आता नीती आयोग अभ्यास सुरू करणार आहे. त्यामुळे २०२० पर्यंत भाव दीड पट करण्याचे नवीन गाजर अर्थसंकल्पामध्ये दिले आहे. जीएसटी लागू केल्यानंतर प्रत्यक्ष करात कपात करण्याचे आश्वासन अरुण जेटली यांनी दिले होते. अर्थसंकल्पामध्ये मात्र प्रत्यक्ष करात वाढ करून व आयकरात कपात न करण्याचे धोरण ठेवून अगोदरच वाढलेल्या महागाईला आमंत्रण दिले आहे. त्यामुळे सर्व स्तरातील जनतेची निराशा झाली आहे. नोटाबंदीमुळे उद्योगांना झालेल्या नुकसानीपोटी त्यांना पॅकेज दिले. नोटाबंदीमुळे कृषी क्षेत्राचे ६० ते ७०हजार कोटी रुपयांचे जे नुकसान झाले आहे त्या बाबत मात्र अर्थसंकल्पात कोणतीही विशेष तरतूद न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत, असा हल्लाबोल मुंडे यांनी ट्विटरवरून केला आहे.

गॅस देणार पण किंमती परवडणार का?
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रीया सुळे यांनी गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याच्या घोषणेचा समाचार घेतला. अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामध्ये गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा केली असली तरी वाढलेल्या गॅसच्या किमतीमुळे या गरीब महिलांना हा गॅस परवडेल का? याचा मात्र विचार केला नाही, असा हल्लाबोल सुप्रीया सुळे यांनी केला. तसेच एका बाजूला ४० हजार द्यायचे आणि दुसरीकडून वैद्यकीय खर्च आणि वाहतूक भत्ता काढून घ्यायचा, म्हणजे मध्यमवर्गीयांना फायदा शून्य, असल्याचे ट्वीट सुळे यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या