
सामना ऑनलाईन । मुंबई
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकासाचा मजबूत, खंबीर आणि धाडसी संकल्प आहे. तो नवभारताच्या निर्मितीसोबतच सकलजनांचा विचार करणारा आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी, गरीब, दलित, आदिवासी आणि वंचित घटकांसाठी अतिशय भरीव तरतुदी करतानाच भारताला उत्पादनाच्या क्षेत्रात विश्वगुरूपदी आरूढ करण्याचा संकल्पसुद्धा महत्त्वपूर्ण आहे, असेही ते म्हणाले.
शेतकरी व गरिबांचा सन्मान – अर्थमंत्री मुनगंटीवार
अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब नागरिक, महिला व युवक या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवल्याबद्दल मी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे अभिनंदन करतो. शेतकरी आणि गरीबांच्या कल्याणाची भूमिका या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. योग्य दिशेने सुरू असलेले केंद्र सरकारचे नियोजन देशाला निश्चितपणे सर्वोच्च स्थानावर नेईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्पात रईस केंद्रस्थानी – राधाकृष्ण विखे पाटील
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात रईस केंद्रस्थानी असून, त्यामध्ये सर्वसामान्यांना कुठेही प्राधान्य नाही. हे सरकार जनतेला न्याय देण्यासाठी काबील नाही. सत्ताधारी भाजप-शिवसेनेत सध्या सुरू असलेली दंगल आणि हा निराशाजनक अर्थसंकल्प पाहता आगामी निवडणुकीमध्ये हे सरकार व्हेंटिलेटरवरच राहील, अशी सध्या गाजत असलेल्या चित्रपटांच्या नावांचा वापर करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांची निराशा करणारा अर्थसंकल्प – धनंजय मुंडे
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेला या वर्षीचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्याची हेराफेरी व वस्तुस्थितीशी फारकत घेणारा आहे. उद्योजकांना सवलती देताना शेतकर्यांना मात्र कर्जमाफीसारखा निर्णय न घेऊन वार्यावर सोडल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांचीही निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.
निव्वळ घोषणांचा पाऊस – जयंत पाटील
या अर्थसंकल्पातील करात सवलत देण्याच्या भूमिकेचे स्वागत करतानाच या अर्थसंकल्पातून निव्वळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आल्याची टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते व राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केली. हा अर्थसंकल्प जास्तच आशावादी असून त्यात दूरदृष्टीचा अभाव असल्याचेही त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात फक्त घोषणा – अशोक चव्हाण
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोणत्याही ठोस योजना नाहीत. केवळ घोषणांचा वर्षाव आहे. हा अर्थसंकल्प सर्वच घटकांना निराश करणारा आहे. कॉर्पोरेटसाठी अनेक सवलती जाहीर केल्या असल्या तरी सर्वसामान्यांसाठी मात्र या अर्थसंकल्पात काहीच नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
गरिबी निर्मूलनावर भर देणारा अर्थसंकल्प – रावसाहेब दानवे
पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद करून देशाच्या आर्थिक विकासाला गती देतानाच विकासाची फळे शेतकरी, गावकरी, गरीब, दलित, आदिवासी, महिला, युवक अशा सर्व समाज घटकांना देणारा हा अर्थसंकल्प असून गरिबी निर्मूलनावर भर देणाऱ्या या अर्थसंकल्पाचे आपण स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.