आज महापालिका अर्थसंकल्प, मुंबईकरांवर होणार सुविधांची उधळण

20

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्रीय अर्थसंकल्पाने आपल्याला काय दिले, अशा प्रश्नात पडलेल्या मुंबईकरांना आज सादर होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून दिलासा मिळणार आहे. यंदाचा पालिकेचा अर्थसंकल्प हा मुंबईकरांवर सोयीसुविधांची उधळण करणारा असेल. रस्ते बांधणी आणि रुंदीकरणाबरोबरच आरोग्य आणि शिक्षणासाठी पालिकेने भरीव तरतूद केल्याचे बोलले जात आहे. याशिवाय मुंबईकरांवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही याची काळजी घेतली असल्याचेही सूत्रांकडून समजते.

मुंबईकरांना दर्जेदार सेवासुविधा देण्यासाठी पालिकेने २०१७-१८च्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीपैकी ४० टक्के निधी खर्च केला आहे. याशिवाय प्रगतिपथावर असलेल्या प्रकल्पांसाठी २० टक्के निधी आणि पुढील दोन महिन्यांत आणखी २० टक्के निधी इतर सुविधांवर खर्च केला जाणार आहे. जकात रद्द करून जीएसटी लावला गेल्याने त्याची भरपाई म्हणून सरकारकडून पालिकेला दरमहा अनुदान दिले जात आहे. त्यामुळे मुंबईकरांवर करांचा बोझा लादण्याची आवश्यकता नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते.

महापालिका आयुक्त अजोय मेहता हे उद्या स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करतील. गेल्या वर्षी २५ हजार १४० कोटींचे बजेट होते. या वर्षी पालिकेने मोठे प्रकल्प हाती घेतल्याने ते १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. नवे उपक्रम, नव्या वास्तू, प्रकल्प मुंबईकरांसाठी सुरू होतील, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले, तर मुंबईला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारा हा अर्थसंकल्प असेल, असा विश्वास सभागृह नेते यशवंत जाधव यांनी व्यक्त केला आहे.

या नव्या सुविधांची घोषणा होण्याचा अंदाज
२४ तास पाणी, मालमत्ता करमाफी, नाहूर सुपरस्पेशालिटी रुग्णालय, गोवंडी शताब्दी रुग्णालयाचा विस्तार, मोठय़ा जलवाहिन्यांच्या बाजूला सायकल व जॉगिंग ट्रक, उपनगरीय रुग्णालयांसाठी टेलिमेडिसीन, भूमिगत वाहनतळ, नवी उद्याने.

आपली प्रतिक्रिया द्या