बिनकामाच्या संसद अधिवेशनाचे सूप वाजले

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

नरेंद्र मोदी सरकारवर लोकसभेत आलेले चार विश्वासदर्शक ठराव प्रलंबित ठेवून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरार्धाचे अखेर शुक्रवारी सूप वाजले. कोणतेही विधायक संसदीय कामकाज न झालेले अधिवेशन म्हणून या अधिवेशनाची नोंद होईलच. शिवाय बिनकामाचे संसदीय अधिवेशन असेही या अधिवेशनाला संबोधले जात आहे.

५ मार्चपासून सुरू झालेला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उत्तरार्ध निव्वळ घोषणाबाजीने गाजला. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची तेलुगू देसम व वायएसआर काँग्रेसची मागणी आणि नीरव मोदीप्रकरणी काँग्रेसची घोषणाबाजी त्याचबरोबर कावेरी जलबोर्डाच्या स्थापनेवरून अण्णा द्रमुकने घेतलेला आक्रमक पवित्रा यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांत कामकाजच होऊ शकले नाही. अर्थसंकल्पालाही आवाजी मतदानाने मंजूर करण्याचा पराक्रम या अधिवेशनात घडला.
आज शेवटच्या दिवशीही संसदेच्या दैनंदिन कामकाजात काडीचाही फरक पडला नाही. लोकसभेचे कामकाज सुरू होताच कावेरीच्या मुद्द्य़ावरून अण्णा द्रमुकच्या खासदारांनी वेलमध्ये धाव घेतली. मात्र अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या सगळ्य़ा गोंधळावर नाराजी व्यक्त करतच लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली. राज्यसभेतही गदारोळानेच कामकाजाला सुरुवात झाली. सभापती व्यंकय्या नायडू यांनी संपूर्ण अधिवेशनात कामकाज होऊ न शकल्याबद्दल खंत व खेद व्यक्त केला.

भाजप, काँग्रेसची एकमेकांविरोधात रॅली

संसदेचे अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी महात्मा गांधींच्या पुतळ्य़ाशेजारी ‘संसद वाचवा’ असे फलक फडकावत घोषणाबाजी केली. त्याचवेळी भाजपच्या खासदारांनी एक रॅली काढत ‘संसद चलाओ’चा नारा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्य़ाजवळ आंदोलन केले.

भाजप खासदारांचे उपोषण

संसदेचे कामकाज हाणून पाडत काँग्रेस लोकशाहीचीच गळचेपी करत आहे, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः भाजप खासदारांना त्याविरोधात आंदोलनाचा आदेश आज दिला. येत्या १२ एप्रिल रोजी भाजपचे खासदार देशभरात काँग्रेसविरोधात उपोषण करतील, अशी घोषणा त्यांनी केली. भाजपचा ३८ वा स्थापना दिन आज साजरा झाला. त्यानिमित्त येथे पक्षाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कामकाजाचे १२७ तास वाया

शुक्रवारी सूप वाजलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २९ वेळा लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृहे भरली. पण त्यात केवळ ३४ तास पाच मिनिटेच कामकाज होऊ शकले. कामकाजाचे १२७ तास गोंधळ-गदारोळामुळे वाया गेले. या अधिवेशनात आवश्यक कामकाजावर नऊ तास ४७ मिनिटे चर्चा झाली. ५८० तारांकित प्रश्नांपैकी फक्त १७ प्रश्नांची उत्तरे दिली गेली. लोकसभेत फक्त पाचच विधेयके सादर होऊन मंजूर झाली. तर अर्थसंकल्पाच्या दिवशी १२ तास १३ मिनिटे कामकाज चालले.