बुल़डाणा जिल्ह्यात मरकजवरून परतलेले तीन जण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 8 वर

बुलडाणा शहरातील एकाचा बळी घेतल्यानंतर कोरोना विषाणूने बुलडाणा जिल्ह्यात हातपाय पसरण्यास सुरुवात केली असून, रविवारी आणखी तिघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या खामगाव, देऊळगाव राजा व चिखली येथील तिघांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 8 झाली असून, यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील एकून 30 जण दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्वांचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. यापैकी तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 12 नमुने निगेटिव्ह आले असून, 15 नमुने अद्याप प्रलंबित आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून 5 मार्चपासून आजपर्यंत एकूण 83 व्यक्तींचे स्वॅब नमुने हे नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 63 जणांचे स्वॅब नमुने प्राप्त झाले आहेत.

शनिवारपर्यंत ही संख्या 53 होती. दरम्यान, यापैकी पाच जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता तर अन्य चार जण हे मृत व्यक्तीच्या निकट संपर्कातील होते. ते सध्या आयसोलेशन कक्षात आहेत. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही स्थिर असल्याचे शनिवारी दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले. दरम्यान, आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबत संदिग्ध म्हणून गणल्या गेलेल्या 112 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या