बुलढाणा – अकोला ते खंडवा रेल्वे मार्ग जिल्ह्यातून जाणार!

अकोला ते खंडवा हा बंद असलेला रेल्वे मार्ग पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. या संदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार हा नवीन रेल्वे मार्ग संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन तालुक्यांमधून जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे. या दृष्टीने राज्य शासन तातडीने पावले उचलणार असल्याची माहिती खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.

दरम्यान, बुलढाणा शहरात तात्पुरते कोविड हॉस्पिटल उभारणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, भोजराज पाटील, लखन गाडेकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात दररोज वाढत असलेली रुग्ण संख्या ही चिंतेची बाब आहे. ही संख्या अशीच वाढत राहिली तर गैरसोय होऊ नये या उद्देशाने बुलढाणामध्ये एक तात्पुरते कोविड रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले असल्याची माहिती खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली.

खासदार जाधव पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची माहिती घेतली त्यावेळी आपण त्यांना जिल्ह्यातील रुग्ण संख्या व इतर संबंधित सर्व माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील संभाव्य रुग्ण संख्या लक्षात घेऊन पुरेशा उपाययोजना आहेत का या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सुमारे दोन हजार रुग्णांची व्यवस्था करता येईल या दृष्टीने नियोजन केले जात आहे. यासाठी क्रीडा संकुल परिसरात किंवा इतरत्र सोयीच्या जागेवर रुग्णालय उभारता येईल का यासंदर्भात चर्चा झाली. याबाबत मंजुरी देऊन तातडीने कामाला सुरुवात केली जाणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या