पोटच्या अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या पित्याला आजन्म कारावासाची शिक्षा

crime

पोटच्या सतरा वर्षीय अपंग मुलीवर सतत लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधम पित्यास आज बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस ठाण्यांतर्गत बेलगाव येथील धर्मेंद्र कांबळे (48) हा आपल्या पत्नी, तीन मुली व एक मुलगा सह पूणे येथे मजूरी करत होता. पूणे येथे असताना त्याच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तो मुलांना घेऊन बेलगावला आला. त्याला दारूचे व्यसन होते. 2018 सालात महाशिवरात्रीच्या दोन दिवस अगोदर सर्व जण झोपले असताना नराधम बापाने मोठी व अपंग असलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले व कोणाला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली. दुसर्‍या दिवशी पीडित मुलीने ही बाब दोन लहान बहिणीला सांगितली. मात्र वडील मारून टाकतील म्हणून त्यांनी कोणालाच काही सांगितले नाही. 20 सप्टेंबरच्या रात्री सुध्दा या नराधम पित्याने अपंग मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता मुलगी व तिच्या बहिनींनी आरडाओरड केली. त्यामुळे हा नराधम अत्याचार न करता झोपला. 21 तारखेला पीडित मुलीने आपल्या काका व काकूला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडित मुलीने काकांसोबत जाऊनपोलिसात वडिलांविरोधात तक्रार दिली. डोणगाव पोलिसांनी नराधम बाप धर्मेंद्र सोपान कांबळे विरोधात कलम 376 (2) (एफ जे एल) व बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.डी. मुंडे यांनी करून मेहकर येथील सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

या प्रकरणात पीडित मुलीच्या बहिणीसह एकूण 11 साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जे.एम. बोदडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. खोंगल यांनी आज आरोपी पित्यास सश्रम आजन्म कारावास व 10 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास पुन्हा 2 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

आपली प्रतिक्रिया द्या