चिखली पोलीस ठाणे इमारत व 72 निवासस्थानांचे थाटात लोकार्पण

487
buldhana-police-thane

राजेश देशमाने । बुलढाणा

कायदा व सुव्यवस्थेची धुरा यथार्थपणे सांभाळणारा पोलीस विभाग हा राज्याचा कणा आहे. पोलीस हे 24 तास कर्तव्यावर असतात. अनेकवेळा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास आहे त्या परिस्थितीत त्यांना कर्तव्यावर हजर व्हावे लागते. त्यामुळे शासनाने त्यांना सुविधा पुरविण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. चिखली शहर पोलीस ठाण्याची देखणी इमारत व येथील 72 निवासस्थानांची संकुल त्याचेच उदाहरण आहे. स्मार्ट पोलीस ठाणा झाले, त्याप्रमाणे पोलिसांनी आपल्या कामातही स्मार्ट रहावे, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी व्यक्त केली.

चिखली शहर पोलीस ठाण्याची इमारत व 72 निवासस्थानांच्या लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन चिखली पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, आमदार राहुल बोंद्रे, नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, माजी आमदार धृपदराव सावळे, रेखाताई खेडेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस गृहनिर्माण मंडळाच्या अधिक्षक अभियंता लीना उपाध्ये, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील, सभापती श्वेता महाले, उपनगराध्यक्षा वजीराबी शेख अनीस शेख बुढन, उपविभागीय अधिकारी सुहासिनी गोणेवार आदी उपस्थित होत्या.

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प विकसित करण्यासाठी नगर परिषदांनी पुढे येण्याचे आवाहन करीत पालकमंत्री म्हणाले, ‘घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही ते नोकरीत असताना पूर्ण करतात, तर काही सेवानिवृत्तीनंतर पूर्ण करतात. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनाही हक्काचे घर मिळण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी नगर पालिकांनी जागा उपलब्ध करून द्यावी. पोलिसांनी काम करताना सामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करावा. सामान्य नागरिक आपली व्यथा घेवून आल्यास त्यांना सौजन्याची वागणूक देत त्यांच्या पाठीशी उभे रहावे. सर्वांसाठी घर या उपक्रमातंर्गत केंद्र व राज्य शासन पंतपधान आवास योजनेच्या माध्यमातून काम करीत आहे. बांधकाम कामगांरासाठी 4.50 लक्ष रूपये घरकुले बांधकामासाठी कामगार विभाग देणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला हक्काचा निवारा असावा यासाठी शासन कटीबद्ध आहे. ते पुढे म्हणाले, पोलीस ठाणा स्मार्ट झाले असून पोलिसांनी आपल्या कृतीतून स्मार्टपणा जपावा. आपले व विभागाची प्रतिमा मलीन होणार नाही, याची काळजी घ्यावी. पोलिसांनी संवेदनशील असावे. राज्यात पुराचे थैमान आहे. त्यामुळे पुरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे. पुणे विभागीय आयुक्त यांच्या मार्फत ही मदत पुरग्रस्तांपर्यंत पाठविण्यात येणार आहे.

याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव यांनी आपले विचार मांडले. आमदार राहुल बोंद्र यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच लीना उपाध्ये, मकरंद रानडे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पाटील यांनी 20 कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प उभारला असल्याचे सांगितले. याठिकाणी 72 निवासस्थाने, सुसज्ज सर्व सुविधांनीयुक्त पोलीस इमारत साकारण्यात आली आहे. सुरुवातीला पालकमंत्री यांच्याहस्ते फित कापून पोलीस ठाणा इमारत व निवासस्थांनाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पोलीस पाटील यांना ओळखपत्र देण्यात आले. तसेच वास्तुविषारद व कंत्राटदार यांचा सत्कार करण्यात आला. संचलन अजीम नवाज राही यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या