दरोड्याच्या तयारीतील अट्टल गुन्हेगारांना अटक, बुलढाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अट्टल गुन्हेगारांची टोळी अलगद सापडली आहे. दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला अत्यंत शिताफीने अटक करण्यात बुलढाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.

संतोष सिताराम पवार (वय -31, रा. चायगाव, ता. मेहकर), राजू शिवाजी इंगळे (वय – 25, रा. बाऱ्हाई पाचला, ता. मेहकर), किरण सोपान चव्हाण (वय – 20, रा. बाऱ्हाई पाचला, ता. मेहकर), किशोर मामा चव्हाण (वय – 26, रा. बाऱ्हाई पाचला, ता. मेहकर) आणि आकाश प्रकाश पवार (वय – 27, रा. खाखरखेर्डा, ता. मेहकर, मूळचा राहणार बाऱ्हाई पाचला, ता. मेहकर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहकर ते डोणगाव रोडवरील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपाजवळ सोनेरी रंगाच्या स्विफ्ट गाडीमध्ये काही व्यक्ती गुन्हा करण्याच्या तयारीमध्ये दबा धरून बसले आहेत, अशी माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागात पाहणी केली असता सोनेरी रंगाची स्विफ्ट आढळून आली. पोलिसांनी सापळा रचत अत्यंत शिताफीने कारमधील पाच जणांना ताब्यात घेतले. यादरम्यान पोलिसांनी चारचाकी स्विफ्टसह तीन मोबाईल. दोन धारधार चाकू, दोरी, लाकडी दांडके, लोखंडी रॉड आणि मिरची पूड असे साहित्य आणि रोख 3320 रुपये असा 4,34,630 रुपयांचा माल जप्त केला.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी दरोडा घालण्यासाठी या ठिकाणी आल्याचे कबूल केले. तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात घरफोड्या केल्याची व मोटार सायकल चोरी केल्याचीही कबुली आरोपींनी दिली. तपासाअंती अटक केलेल्या आरोपींवर जबरी चोरी, घरफोडी आणि दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. या प्रकरणी पुढील तपास मेहकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि युवराज रबडे करत आहेत.

ही कारवाई बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, खामगावचे अपर पोलीस निरीक्षक हेमराजसिंह राजपूत, बुलढाण्याचे अपर पोलीस निरीक्षक बजरंग बनसोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलील अंमलदार गजानन अहेर, गजानन गोरले, नदीम शेख, विजय सोनोने, वैभव मगर, सुरेश भिसे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या