बुलढाण्यातील बाल सुधारगृहात दोन बालकांची गळफास घेवून आत्महत्या

बुलढाणा येथील शासकीय बाल सुधारगृहातील दोन बालकांनी टॉवेल व बेडशिटच्या साहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी 5 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता उघडकीस आली. मंगेश डाबेराव वय वर्ष 15 आणि गजानन बांगरे वय वर्ष 17 अशी आत्महत्या केलेल्या बालकांची नावे आहेत. सदर आत्महत्या मानसिक तणावामुळे केल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर आत्महत्या केल्याची घटना शासकीय निaरीक्षण व बाल गृहामधील  लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

शेगांव येथील घरफोडी प्रकरणात पकडलेले हे बुलढाणा येथील बाल गृहामध्ये राहत होते. 23 नोव्हेंबरला बालन्याय मंडळाच्या आदेशाने ते तेथे दाखल झाले होते. दरम्यान आज शनिवारी 5 डिसेंबरच्या पहाटेच्या सुमारास दोन्ही बालकांनी टॉवेल व बेडशीटच्या साहाय्याने पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेत आत्महत्या केली. ज्या खोलीत त्यांनी आत्महत्या केली तिथे आणखी एक विधी संघर्षग्रस्त बालक नितीन जमदाडे उपस्थित होता. त्याला जाग आल्यानंतर त्याने हा प्रकार बघितला व आरडाओरड केला. यानंतर या घटनेची माहिती बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोस्टचे ठाणेदार प्रदिप साळुखे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.

दरम्यान जिल्हा बालन्याय मंडळाच्या प्रमुख व सदस्यांनी, जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, प्रभारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अरविंद रामरामे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचे अवलोकन केले. या घटनेचा पुढील तपास पोलिस
उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरु हे करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या