बुलढाण्याची ‘लेडी सिंघम’ चीनमध्ये सुवर्णपदकाची मानकरी

1896

चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एका पोलीस महिलेने बाजी मारली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस ठाण्यात कार्यरत कॉन्स्टेबल मोनाली हर्षचंद्र जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी नोंदवली. हिंदुस्थानच्या पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या मोनालीने 720 पैकी 716 गुण मिळवित दोन सुवर्ण पदक आणि एक कांस्य पदक मिळविले आहे.

मोनाली हर्षचंद्र जाधव ही 2013 मध्ये पोलीस दलात भरती झाली असून ती बुलढाणा शहरातील आनंद नगरची ती रहिवासी आहे. मोनाली आंतरराष्ट्रीय खेळाडू सुद्धा आहे. चीनच्या चेंगडू येथे 8 ते 18 ऑगस्ट दरम्यान जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये मोनालीने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले. मोनालीने फिल्ड आर्चरीत सुवर्ण, तर थ्रीडी आर्चरी प्रकारात कांस्य पदक मिळविले आहे. तिने याआधी मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना नववे स्थान मिळविले होते. मोनालीला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग, सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांचे प्रोत्साहन मिळाले. तिच्या या यशाबद्दल बुलढाणा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी तिचे अभिनंदन केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातून मोनालीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

buldhana1

आपली प्रतिक्रिया द्या