बुलढाण्यात साकारला जातोय जागतिक दर्जाचा अ‍ॅम्युझमेंट पार्क

3765

सामना प्रतिनिधी। बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्याच्या वैभवात भर घालण्यासाठी एका अद्ययावत आणि जागतिक दर्जाच्या अ‍ॅम्युझमेंट पार्कची निर्मिती केली जात आहे. बुलढाणा ते मलकापूर मार्गावरील व्यंकटगिरी पर्वतावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या सुप्रसिद्ध बालाजी मंदिराला लागून तब्बल 12 एकर जागेवर हा ‘स्वप्ननगरी’ अ‍ॅम्युझमेंट पार्क साकारला जाणार आहे. 17 ऑगस्ट रोजी एक हजार वृक्षांची लागवड करुन या पार्कच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.

राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक राहणार आहेत. या कार्यक्रमाला खासदार प्रतापराव जाधव, आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार राहुल बोंद्रे, माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, नगराध्यक्षा नजमुन्नीसा बेगम मो. सज्जाद, भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, माजी आमदार विजयराज शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड, जि. प. सदस्या अ‍ॅड. जयश्री शेळके, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक मोहन चांगदे तथा रामोजी फिल्म सिटीचे सीईओ राजीव जालनापूरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

बालाजी सेवा समिती व श्रीनिवास एंटरटेनमेंटच्या वतीने ‘स्वप्ननगरी’ अ‍ॅम्युझमेंट पार्क हा जिल्ह्याचा मुकुटमनी ठरणारा प्रकल्प हाती घेतला आहे. अगदी लहान वयाच्या बालकांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तिंना मनसोक्त आनंद लुटण्यासह एक वेगळा अनुभव देणारी विविध 14 आकर्षणे या पार्कमध्ये राहणार आहेत. जागतिक दर्जाच्या 5 डी राईड मध्ये प्रथमच हनुमानाचे पराक्रम अनुभवता येतील. सोबतच बालाजी मंदिराला भेट देण्यार्‍या भक्तांसाठी एका सुसज्ज चित्रपटगृहात तिरुपती बालाजींचा जिवनपट दाखविल्या जाणार आहे. सदर चित्रपटाच्या निर्मितीचे काम सध्या सुरु आहे. लहान मुलांसाठी वेगवेगळ्या राईडस् तसेच उंचावरुन चालणारी रेल्वे देखील येथे धावणार आहे. या उद्यानाचे विशेष आकर्षण म्हणजे जगभरातील काही उद्यानात असलेले आणि पूर्णपणे खरे वाटणारे मोठमोठे डायनासोर पहिल्यांदाच महाराष्ट्रात दाखल होत असून हे डायनासोर या उद्यानात पाहता येणार आहेत, बालकासंह सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी ही विशेष पर्वणी ठरणार आहे. तसेच सदर पार्कच्या मध्यभागी एक चाळीस मीटर उंचीचे फिरते रेस्टॉरंट राहणार आहे. त्यामध्ये बसून पर्यटकांना या परिसरातील डोळे दिपवणार्‍या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेता येणार आहे. सदर पार्कच्या निर्मितीचे काम पुण्याच्या जगप्रसिद्ध गार्डीयन एंटरटेनमेंट या संस्थेकडे सोपविण्यात आले असून हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीचे प्रमुख राजीव जालनापूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु आहे. लवकर हे आगळेवेगळे पार्क नागरिक आणि पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार असून या कामाचा शुभारंभ 17 ऑगस्ट रोजी एक हजार वृक्ष लाऊन केला जाणार आहे. या कार्यक्रमाला शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बालाजी सेवा समितीचे अध्यक्ष आणि ‘स्वप्ननगरी’ अ‍ॅम्युझमेंट पार्कचे प्रमुख अरुण दिवटे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या