बुल्लीबाई प्रकरण – श्वेता सिंग आणि मयांक रावतला तीन दिवसांची पोलीस कोठडी

बुल्लीबाई प्रकरणात मुंबई सायबर पोलिसांनी अटक केलेल्या श्वेता सिंग आणि मयांक रावतला आज वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ऍप्सवर फोटो अपलोड करण्याचा त्या दोघांचा नेमका काय हेतू होता, याबाबत पोलीस श्वेता आणि मयांकला समोरासमोर बसवून चौकशी करणार आहेत.

मुस्लिम महिलांची बदनामीप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून बंगळुरू येथून विशालला अटक केली होती. विशालच्या अटकेनंतर पोलिसांचे पथक उत्तराखंड येथे गेले. तेथून पोलिसांनी श्वेता आणि मयांकला अटक केली होती. त्या दोघांना ट्रांझीट रिमांडवर गुरुवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. आज दुपारी त्या दोघांना आज वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. बुल्लीबाई ट्विटरवर महिलांचे फोटो अपलोड करण्यामागे त्या दोघांचा नेमका हेतू काय होता, त्याबाबत तपास करणे आवश्यक असल्याने दोघांना पोलीस कोठडी देण्यात यावी अशी विनंती पोलिसांनी कोर्टात केली. न्यायालयाने त्या दोघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आतापर्यंत श्वेता आणि मयांकचा जबाब नोंदवला नाही. जबाब नोंदवल्यानंतर काही बाबी समोर येणार आहेत.

बुल्लीबाई प्रकरणाचा जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा मुंबई पोलिसांना गीयू44 या ट्विटर हॅन्डलवरून एक ट्विट आले होते. त्या ट्विटर हॅन्डलबाबत पोलिसांनी ट्विटरकडे माहिती मागितली होती, मात्र पोलिसांना तेव्हा माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. जर ट्विटरने ही माहिती वेळीच दिली असती तर नीरज बिष्णोईला सायबर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या असत्या.

नीरजने तयार केले होते पाच ट्विटर अकाऊंट

बुल्ली बाई प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या नीरज बिष्णोईच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. नीरजने गियू 2002, गियू 007. गियू 84, गियू 94, गियू 44 नावाने ट्विटर अकाऊंट तयार केले होते. तपास सुरू असतानाच पोलिसांना गियू 2002 या अकाऊंटची माहिती हाती लागली. त्या अकाऊंटमधून महिलांचे फोटो आणि लिलावाची माहिती ट्विट केली होती. तसेच नीरजने 3 जानेवारीला गियू 44 नावाने आणखी एक अकाऊंट ट्विटरवर तयार केले. ते अकाऊंट तयार करून त्याने थेट मुंबई पोलिसाना चॅलेंज केले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नीरजने ते अकाऊंट नेपाळ येथील असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. दिल्ली पोलीस हे सुली डिल्स प्रकरणाचा तपास करत असतानाच पोलिसांना गियू 007 या ट्विटरवर अकाऊंटची माहिती मिळाली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नीरजने महिलेच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केले.