बार्यन म्युनिक सलग नवव्यांदा विजेते, बुंदेसलीगा फुटबॉल स्पर्धा

जर्मनीतील सर्वात मोठी क्लब फुटबॉल लीग असलेल्या बुंदेसलीगाचे बार्यन म्युनिक क्लबने सलग नवव्यांदा विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. या क।बने कारकिर्दीत 31व्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. बार्यन म्युनिक क्लबने यावेळी बोरुसिया मोनचेनग्लॅडबाकला 6-0 अशा फरकाने हरवले आणि बोरूसिया डॉर्टमंडने आरबी लिपझिगला 3-2 असे पराभूत केले. यामुळे बायर्न म्युनिकला जेतेपदावर मोहोर उमटवता आली.

बार्यन म्युनिक क्लबने 2012 सालापासून सलग ही स्पर्धा जिंकलेली आहे. प्रशिक्षक हंसी फ्लिक यांच्या मार्गदर्शनाखाली या क्लबने ही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र, त्याच्या नेतृत्वाखालील बार्यन म्युनिक क्लबचे हे अखेरचे विजेतेपद असेल. कारण आता ज्युलियन नगेल्समॅन हे बार्यन म्युनिक क्लबचे नवे प्रशिक्षक असणार आहेत.

32 पैकी 23 सामने जिंकले

बुंदेसलीगा स्पर्धेत बार्यन म्युनिक क्लबने 32 सामन्यांनंतर 74 गुणांसह गुणतालिकेत अक्वल स्थानी झेप घेतली. या क्लबने 32 पैकी 23 सामने जिंकून विजेतेपदाला गवसणी घातली. यातील पाच लढती ड्रॉ झाल्या, तर 4 सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली. दुसरीकडे आरबी लीपजिग क्लबने 32 सामन्यांनंतर 64 गुणांची कमाई केली. या क्लबने 19 लढती जिंकल्या असून, 7 लढती बरोबरीत सुटल्या, तर 6 वेळा त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. वूल्फ्सबर्ग क्लब 32 पैकी 17 सामने जिंकून या स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱया स्थानी आहे.

मुलर व अलाबाचा ‘दस का दम’

थॉमस मुलर व डेव्हिड अलाबा या बार्यन म्युनिक क्लबच्या खेळाडूंनी सर्वाधिक दहाव्यांदा बुंदेसलीगा स्पर्धेचा किताब जिंकला आहे. फ्रेंक रिबेरिसह जेरोम बोटेंग, रॉबर्ट लेवांडोक्स्की, जेवी मार्टिनेज व मॅनुअल न्युएर यांनी 9 वेळा जर्मनीतील या मानाच्या स्पर्धेचा करंडक उंचावलेला आहे.

रॉबर्ट लेवांडोक्स्कीचे सर्वाधिक गोल

बार्यन म्युनिक क्लबचा स्ट्रायकर रॉबर्ट लेवांडोक्स्की याने यंदाच्या बुंदेसलीगा स्पर्धेत सर्वाधिक 36 गोल केले. या सत्रात सर्वाधिक 43 गोल करण्याचा पराक्रमही त्यानेच केला. लेवांडोक्स्कीनंतर इन्ट्राच फ्रँकफर्ट क्लबच्या आंद्रे सिल्वाने 25 गोल केले. बोरुसिया डॉर्टमंड क्लबचा एर्लिंग हॉलंडही 25 गोलसह तिसऱया स्थानी आहे. म्युनिक क्लबचाच थॉमस मुलर 17 गोलसह चौथ्या स्थानी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या