राजभवनातील भूमिगत बंकर सर्वसामान्यांसाठी खुले होणार, आज राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

682

राजभवनातील हिरवळीखाली ब्रिटिशकालीन बंकर तीन वर्षांपूर्वी सापडले होते. या बंकरची छायाचित्रे पाहिल्यानंतर हे बंकर कसे असतील याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. दारूगोळा, तोफांचे कोठार असलेले या ब्रिटिशकालीन बंकरचे लोकार्पण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. यानिमित्त कुतूहलाचा विषय असलेला राजभवनाचा परिसर आणि बंकररूपी संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.

राजभवनाच्या परिसरात सापडलेले हे बंकर अनेक दशके बंदिस्तच होते. दुर्लक्षित असल्याने तसेच सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे वास्तू स्थापत्यदृष्टय़ा कमजोर झाली होती. भुयारसदृश असलेल्या या बंकरवर राज्यपालांचे निवासस्थान तसेच जलभूषण ही वास्तू उभी आहे. त्यामुळे राज्यपालांच्या सुरक्षेशी तडजोड न करता बंकरचे संवर्धन करून सर्वसामान्यांना ही वास्तू पाहण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. भूमिगत बंकरच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले व नंतर तिचे बळकटीकरण करण्यात आले. त्यानंतर बंकरमध्ये आभासी वास्तवदर्शी संग्रहालय करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या प्रयत्नांनी हे संग्रहालय आता सर्वसामान्यांसाठी खुले होत आहे.

असे आहेत बंकर
या बंकरमध्ये विविध आकारांचे 13 कक्ष असून बंकरच्या सुरुवातीला 20 फूट उंच भव्य प्रवेशद्वार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रदीर्घ उतार (Ramp) आहे. बंकरचा शोध लागला त्यावेळी त्यातील कक्षांना ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार (Cartridge Store), शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसून आली होती. बंकरमध्ये पाण्याच्या निचऱ्याची तसेच शुद्ध हवा व नैसर्गिक प्रकाशाची योग्य व्यवस्था असल्याचे आढळले. बंकरचे संवर्धन करताना त्यातील सर्व मूळ वैशिष्टय़े जतन करण्यात आली आहेत.

मिळणार तोफ चालवण्याचा अनुभव
बंकरमध्ये आभासी वास्तव दर्शवणारे कक्ष तयार करण्यात आले आहेत. इथे भेट देणाऱ्याला तोफ चालवण्याचा आभासी अनुभव घेता येईल. राज्यातील गडकिल्ल्यांचा इतिहास तसेच राजभवनाचा इतिहासदेखील पाहता येईल. तोफांच्या प्रतिकृती व जवानांच्या त्रिमितीय आकृतीदेखील या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.

जुळ्या तोफा
राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथे नोव्हेंबर 2018 साली दोन भव्य ब्रिटिशकालीन तोफा सापडल्या होत्या. दोन्ही तोफा क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या. नुकत्याच या जुळ्या तोफा राजभवनातील जल विहार (बँक्वेट हॉल) हॉलच्या समोर दर्शनी भागात ठेवण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते या तोफांपुढे कोनशिला ठेवण्यात येणार आहे. राजभवनाला भेट देणाऱ्या लोकांना तसेच इतिहासप्रेमींना या तोफा पाहता येणार आहेत. या तोफांचे वजन प्रत्येकी 22 टन असून लांबी 4.7 मीटर तर अधिकतम व्यास 1.15 मीटर इतका आहे.

आपली प्रतिक्रिया द्या