घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक, सोन्या-चांदीचे दागिने आणि 4 लाखांचा मुद्देमाल जप्त.

लातूरमध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे करणारे संशयित आरोपी हे बीड व अहमदनगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत, अशी माहिती 2 नोव्हेंबर 2022 रोजी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बीड, अहमदनगर जिल्ह्यात रवाना करण्यात झाले. त्यांनी 3 जून 2023 रोजी लातूर जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली.

यामध्ये अमोल धर्मा इगवे (28, रा. उमापूर तालुका गेवराई जिल्हा बीड), गणेश मिलिंद सूर्यवंशी (23, रा. घुमेगाव, ता. गेवराई जिल्हा बीड), विकास सुनील घोडके (27, रा. मेनरोड, शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या अजून एका साथीदारासह लातूर शहरातील विविध ठिकाणी घरफोडीचे गुन्हे करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे कबूल केले.

लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची पडताळणी केली असता आरोपीने लातूर शहरातील पोलीस ठाणे शिवाजीनगरच्या हद्दीत 3 घरफोडीचे गुन्हे व पोलीस ठाणे एमआयडीसीच्या हद्दीत 4 घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. घरफोडीच्या गुन्ह्यात चोरलेल्या सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 04 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार, स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील सपोनी व्यंकटेश आलेवार, पोलीस अंमलदार खुर्रम काझी, यशपाल कांबळे, राजेश कंचे, संतोष देवडे, मोहन सुरवसे, रवी गोंदकर, मनोज खोसे, राहुल कांबळे, नकुल पाटील यांनी बजावली आहे.