मुख्यमंत्री म्हणतात स्थगिती, तरीही प्रकल्प रेटारेटी; फलकाची शिवसैनिकांनी केली होळी

20

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार येथील पेट्रोकेमिकल रिफायनरीसाठीच्या भूसंपादनाला स्थगिती दिलेली असतानाच राजापूरात एस.टी.स्टॅण्ड समोर पेट्रोकेमिकल रिफायनरीचे गोडवे गाणारा फलक लावून त्याच्यासमोरच पेट्रोकेमिकल रिफायनरी संबधित एक कार्यालय थाटण्यात आले असल्याची बातमी शिवसैनिकांना कळताच शिवसैनिकांनी फलक फाडून त्याची होळी केली. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून पेट्रोकेमिकल रिफायनरीतून मिळणाऱ्या रोजगारांची माहिती देणाऱ्या कार्यालयाला कुलूप ठोकून कर्मचाऱ्यांनी धूम ठोकली.

नाणार येथील प्रस्तावित पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. आज आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, सभापती अभिजीत तेली, रामचंद्र सरवणकर, दिनेश जैतापकर यांच्यासह शिवसैनिकांनी राजापूरात एस.टी.स्टॅण्ड परिसरात पेट्रोकेमिकल रिफायनरीचा फलक शिवसैनिकांनी फाडून जाळून टाकला. पेट्रोकेमिकल रिफायनरीविरोधात शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता. त्याच परिसरात पेट्रोकेमिकल रिफायनरीमुळे निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांची माहिती देणारे एक कार्यालय सुरु करण्यात आले होते. संतप्त शिवसैनिकांना पाहून कार्यालयाला कुलूप लावून संबधित कर्मचाऱ्यांनी पळ काढला. पुन्हा जर पेट्रोकेमिकल रिफायनरीचे कार्यालय याठिकाणी दिसले तर कार्यालय फोडून टाकू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.

यावेळी आमदार राजन साळवी यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार येथील पेट्रोकेमिकल रिफायनरीसाठीच्या भूसंपादनाला स्थगिती दिलेली होती. त्यानंतर रिफायनरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी काम थांबविणे गरजेचे होते मात्र तसे न करता राजापूरात एक फलक उभारून कार्यालय सुरु करण्यात आले होते. आज आम्ही तो फलक जाळून टाकला. कार्यालयाच्या दिशेने गेलो असता ते बंद होते. यापुढे राजापूरात रिफायनरीचे कार्यालय किंवा समर्थन करणारे फलक उभारू नयेत अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा आमदार साळवी यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या