रेल्वे अपघातांची मालिका सुरूच आहे. छत्तीसगडमधील कोरबा येथून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला पोहोचलेल्या कोरबा एक्स्प्रेस ट्रेनच्या डब्यांमध्ये अचानक भीषण आग लागली. ही ट्रेन कोरबाहून तिरुमलाला जात होती. ट्रेन स्टेशनवर थांबली असताना स्टेशनच्या चार नंबर प्लॅटफॉर्मवर आगीची घटना घडली. यात 3 एसी डब्यांसह चार डबे जळून खाक झाले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप नाही; परंतु रेल्वे अपघातांमध्ये किडय़ामुंग्यांसारखे लोकांचे जीव जात आहेत. असे असताना केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून कोणतीही ठोस पावले का उचलली जात नाहीत, असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून केला जात आहे.
बी 7 डब्याच्या टॉयलेटमध्ये शॉर्टसकाaट झाल्याने हा अपघात झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बी 7 डबा पूर्णपणे जळून खाक झाला, तर बी 6 आणि एम 1 डब्यापर्यंत आग पसरली. आग लागली तेव्हा डब्यात प्रवासी नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. आग लागल्याचे वृत्त कळताच अग्निशमन दलाचे जवान आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोठय़ा शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.
उत्तर प्रदेशात पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरून दुसऱ्या रुळावर गेले. ही ट्रेन दिल्लीहून सहारनपूरच्या दिशेने जात होती. या घटनेनंतर रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आगीत डब्यातील चादरी, थर्माकोल, बेंडिंग आदि साहित्य जळाले असून घटनेच्या वेळी डबे रिकामे होते आणि ट्रेन दुरुस्ती तसेच देखभालीसाठी डेपोमध्ये जाणार होती, अशी माहिती व्होल्टेअर विभागाचे डीआरएम सौरभ प्रसाद यांनी दिली. दरम्यान, नेमके काय घडले याचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही ते म्हणाले.