अमरनाथ यात्रेकरूंवर पुन्हा काळाचा घाला १६ ठार, २७ जखमी

16

सामना ऑनलाईन । जम्मू

पवित्र गुहेतील बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी निघालेल्या अमरनाथ यात्रेकरूंवर काळाने घाला घातला. यात्रेकरूंची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 16 भाविक ठार झाले, तर 27 जण जखमी झाले. त्यापैकी 19 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रामबण जिह्यात जम्मू-कश्मीर महामार्गावर नचलानाजवळ हा अपघात झाला. हवाई दलाच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच यात्रेकरूंच्या बसला भयंकर अपघात झाला. कश्मीर खोऱयातील रामबण जिह्यातील जम्मू-कश्मीर महामार्गावरून राज्य महामार्ग परिवहन महामंडळाची बस क्र. जेके 02 वायई 0594 ही जात होती. नचलाना गावाजवळ अचानक भरधाव बस खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात 16 यात्रेकरूंचा जागीच मृत्यू झाला, तर 27 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे रामबणचे पोलीस अधीक्षक मोहनलाल यांनी सांगितले.

दरीत अडकलेल्या यात्रेकरूंना बाहेर काढून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने रामबण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना 50 हजारांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या