भिवंडीत एसटी चालकाचा मृत्यू, ठाणे, नांदेडमध्ये पडसाद

सामना ऑनलाइन । भिवंडी

भिवंडीत रिक्षाचालकांच्या मारहाणीत एसटी चालक प्रभाकर गायकवाड यांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेचे पडसाद ठाणे आणि नांदेडमध्ये आज (शुक्रवारी) सकाळीही उमटले. एसटी चालकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठाणे आणि खोपट एसटी आगारातून भिवंडी, बोरिवली, मीरा-भाईंदर, वसईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. नांदेडमध्येही एसटी चालकांनी प्रभाकर गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.

एसटीचालक प्रभाकर गायकवाड बुधवारी रात्री भिवंडीच्या आगारात एसटी नेत होते. त्याचवेळी आगाराच्या प्रवेशद्वारावर एक रिक्षा आडवी आली. गायकवाड यांनी रिक्षा चालकाला बाजूला हटण्यास सांगितले. यावरुन गायकवाड आणि संबंधित रिक्षा चालकात वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आजूबाजूला उभ्या असलेल्या रिक्षा चालकांच्या सोबतीने वाद घालणाऱ्या रिक्षा चालकाने गायकवाड यांना बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे गायकवाड यांना चक्कर आली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेध करण्यासाठी गुरुवारी भिवंडी आगारातील एसटी वाहतूक बंद होती. एसटी चालकांनी मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या