जगभरात सध्या तणावाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानात इस्रायल – इराण, लेबनॉन, हमास यांच्यातील संघर्ष वाढला असून युद्धाला सुरुवात झाली आहे. या घडामोडींचा परिणाम जागतिक शेअर बाजारावरही दिसत आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बड्या गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत सोन्याने 600 रुपयांहून अधिकची उसळी घेतली. पण चांदीच्या दरात जास्त फरक झालेला नाही. जागतिक अस्थिरता बघता आगामी काळात सोन्याच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
गेल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले होते. 30 सप्टेंबर रोजी सोने 160 रुपयांनी तर 1 ऑगस्ट रोजी 330 रुपयांनी सोने घसरले होते. 2 ऑक्टोबर रोजी त्यात 540 रुपयांची वाढ झाली. 3 ऑक्टोबर रोजी सोने 110 रुपयांनी वधारले. आता 22 कॅरेट सोने 71,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 29 सप्टेंबरपासून चांदीच्या दरात फारसे बदल झालेले नाहीत. सध्या एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.
आता नवरात्र सुरू असून दिवाळीनंतर लगेचच लग्नसराई सुरू होणार आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत असताना सोने खरेदी कशी करायची असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे अनेकजण चांदी आणि इतर धातूंच्या दागिन्यांकडे वळत आहे. मात्र, सध्याच्या काळात ज्यांना सुरक्षित गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी सोने हा उत्तम पर्याय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.