आता अॅपलमध्ये दिसणार हिंदूस्थानी इंजिनीअर्स

37

सामना ऑनलाईन । हैदराबाद

जगभरातील नामांकीत टेक्नॉलॉजी कंपनी आणि आपल्या उत्पदनांनी तरूणांना खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजीचे वेड लावणारी कंपनी म्हणजे अॅपल. ही कंपनी आता हिंदुस्थानामधील इंजिनीअर्स आपल्या ताफ्यात सामील करून घेणार आहे. अॅपल पहिल्यांदाच हिंदुस्थानातील अभियांत्रिकी कॉलेज कॅम्पसमध्ये नोकरीच्या मुलाखतीसाठी येणार आहे. हैदराबादमधील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी) या संस्थेत अॅपलमधील अधिकारी येणार असल्याचं कळल्यानं विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय.

इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉलेजचे प्लेसमेंट हेड टी व्ही देवी प्रसाद यांनी दिलेल्या माहीतीनुसार, ‘कॅम्पस प्लेसमेंटसाठी अॅपलसारखी जगभरातील नामांकीत कंपनी येतेय, ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या हैदराबाद आणि बेंगळुरू कॅम्पसमध्ये जाऊन ते प्लेसमेंट इंटरव्ह्यू घेणार आहेत. नेमक्या कोणत्या कामासाठी त्यांना इंजिनीअर्स हवेत, हे अजून समजलेले नाही. पण या निमित्ताने आपल्या विद्यार्थ्यांना आपल्यातील कौशल्य, प्रतिभा दाखवण्याची उत्तम संधी मिळणार आहे.’

अॅपलसोबतच गुगल, मायक्रोसॉफ्ट, फिलिप्स यासारख्या नामांकित कंपन्याही डिसेंबरमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी विविध महाविद्यालयांमध्ये येणार आहेत. हार्डवेअर इंजिनीअर्सना वाढती मागणी असल्याचे जाणकारांनी सांगितले. आर्टिफिशल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, ऑटोमेशन यात कुशल असलेल्या तरुणांना मोठी संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी वेगवेगळ्या शाखा आणि अभ्यासक्रमातील अंदाजे ३५० विद्यार्थांनी आपली नावे नोंदवली आहेत.

गेल्या दोन दशकांत हिदुस्थानातील तरुणांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जगभरात विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये हिंदूस्थानी तरुण महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत आहेत. त्यांचं कर्तृत्व पाहूनच अॅपलनंही हिंदुस्थानकडे आपले लक्ष केंद्रीत केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या