निसर्गाची माय

60

प्रज्ञा घोगळे

निसर्गातला प्रत्येक घटक आपल्या जगण्यास हातभार लावत असतो. परंतु आपली प्रत्येक कृती मात्र या निसर्गासाठी मारकच ठरली  आहे. अनेक परिसंस्था आपण उद्ध्वस्त करत आहोत, हे आपल्या लक्षातच येत नाहीये, पण अशा काही व्यक्ती आहेत जे निसर्गाचं हे देणं मान्य करत तिच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. यातीलच एक म्हणजे फुलपाखरांच्या अभ्यासक व्ही. शुभलक्ष्मी.

फुलपाखरांच्या दुनियेचं आपल्याला नेहमीच कुतूहल असतं. मात्र ही विविधरंगी दुनिया आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे उजाडत चालली आहे. हा धोका लक्षात घेऊन फुलपाखरांच्या जगाचा अभ्यास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्ही. शुभलक्ष्मी यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. व्ही. शुभलक्ष्मी या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत २१ वर्षे डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत होत्या. या कंपनीत कार्यरत असताना त्यांनी पक्षीसंवर्धन, पक्ष्यांविषयी माहिती जाणून घेऊन पक्षी, प्राणी, झाडे, वनस्पती, किडे, कीटक या विषयांवर ५५ कार्यक्रम केले असून ३५ प्रकल्प तयार केले. त्यानंतर जुलै २०१४ साली ही कंपनी सोडून त्यांनी स्वत:ची लेडी बर्ड एनव्हायर्नमेन्ट ही संस्था काढली.

लेडी बर्ड एनव्हायर्नमेन्ट या संस्थेद्वारे निसर्गाचा सर्वतोपरी जागरुकता आणणारे बटरफ्लाय वॉक, बर्ड वॉक, ट्री वॉक, वाईल्ड फ्लॉवरवॉक, मान्सून वॉक, विंटर इकोलॉजी वॉक, नेचर वॉक असे उपक्रम राबवले जातात. मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क; बोरिवली, महाराष्ट्र नेचर वॉक; धारावी, जिजामाता उद्यान; भायखळा, सायन किल्ला, जी.टी.पी. गार्डन, नवी मुंबईतील खारघर हिल, व्हॅली पार्क, येऊर हिल, ओवळेकर बटरफ्लाय अशा स्थानिक ठिकाणी हे उपक्रम असतात. तसेच विविध वर्कशॉपही घेतले जातात. ज्यात घरातील जागेत, कॉलनीत झाड लावणे, बटरफ्लाय गार्डन, जैवविविधता याविषयी माहिती दिली जाते. या वर्कशॉपमध्ये मान्सून कॅम्प, विंटर कॅम्प, बटरफ्लाय कॅम्प, बर्ड कॅम्प, ट्री कॅम्प या विषयावर लेक्चर दिले जाते. इन्सेट कॅम्प हा कीटकांविषयी असतो. हा पावसाळा आणि त्यानंतरच्या महिन्यात घेतला जातो. नेचर ट्रेनिंग कार्यक्रम हा तीनदिवसीय कॅम्प असून हे कॅम्प कसे अरेंज करायचे याचे मार्गदर्शन या वर्कशॉपमध्ये दिले जाते.

संस्थेचा अनोखा उपक्रम म्हणजे फुलपाखरांची बाग. फुलपाखरांची बाग. ज्या झाडांना पाहून तिथे हजारो फुलपाखरे आकर्षित होतील अशा झाडांची लागवड यात केली जाते. इथे फुलपाखरे आकर्षित होऊन वास्तव्य करतात. एक हजारच्या आत जर फुलपाखरांची संख्या आढळली की, त्याला फुलपाखरांची बाग म्हटले जाते, तर एक हजारच्या वर फुलपाखरे असतील तर त्याला हॅबिटॅट असे संबोधले जाते. असे हॅबिटॅट महाराष्ट्रात सात ठिकाणी असून एक बंगलोर येथे आहे. मुंबईतील महाराष्ट्र नेचर पार्क, मुलुंड येथील चिंतामणी देशमुख आणि सार्वजनिक उद्यान, चेंबूरमधील नॅशनल पार्क, वाशीतील सेक्रेट हार्ड स्कूल येथील बाग, ठाण्यामधील टाटा हाऊसिंग, बेलापूरमधील अर्बन हार्ट अशा ठिकाणी तर बंगलोर येथे टिप हार्ड असून ही हॅबिटॅट व्ही. शुभलक्ष्मी यांच्या संस्थेच्या संकल्पनेतून तयार करण्यात आली आहेत. काही उद्याने विद्यार्थ्यांकरिता तर काही अपंगांच्या आनंदाकरिता बांधण्यात आली. या हॅबिटेटमध्ये अनेकविध जातीची फुलपाखरे आढळतात.  या ठिकाणीदेखील दुर्मिळ फुलपाखरे येतात.

व्ही. शुभलक्ष्मी या के. जी. सोमय्या महाविद्यालयाच्या पर्यावरण अभ्यास मंडळाच्या सदस्या असून बोस्टन युनिव्हर्सिटीत ऑनलाइन लेक्चरर आहेत. त्याचप्रमाणे २०१६ साली त्यांना ग्रीन सी. एस. आर. पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांचा असा एक उद्देश आहे की, निसर्ग मानवाला जगण्याची उमेद देतो त्याचा मान राखा आणि त्याला आपलंसं करा. व्ही. शुभलक्ष्मी यांनी निसर्गाला आईसमान मानून तिच्या सेवेचा प्रारंभ केला आहे. त्यांच्यासारखंच आपणही निसर्गाला आपलंसं करून आपला सखासोबती बनवायला हवं.

ऑफलाइन मोबाईल अॅप

व्ही. शुभलक्ष्मी यांच्या कामाचा गवगवा आहे तो आय नेचरवॉच फाउंडेशनद्वारे त्यांनी तयार केलेले पहिले मोबाईल ऍप्स. इंटरनेटशिवाय वापरता येणारी झाडं, पक्षी, फुलपाखरं आणि संजय गांधी नॅशनल पार्क  यांची माहिती देणारी ही ऍप्स आहेत. या ऍपमध्ये झाडे, फुलपाखरे, प्राणी, पक्षी, पायवाट तसेच आजूबाजूची माहिती  दाखवण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि हैदराबाद या भागांतून माहिती गोळा करून तयार केलेले हे ऍप्स आहेत. सध्याची मुलं सतत मोबाईलचा वापर करतात, तर त्यांना मोबाईलच्या सहवासात राहून निसर्गाचीदेखील गोडी लागावा, या उद्देशानेच हे अॅप्स तयार केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या