Hong Kong Open – सलामीच्या सामन्यापूर्वीच लक्ष्य सेनची स्पर्धेतून माघार

हाँगकाँग येथे सुरू असलेल्या हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यापूर्वीच हिंदुस्थानचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने माघार घेतली. तर, महिला गटात अश्विनी पोनप्पा आणि तनीषा कॅस्ट्रो यांनी महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे. या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात लक्ष्य सेनचा सामना चिनी तैपेईचा सू याच्याबरोबर होणार होता. मात्र, सामना सुरू होण्याच्या काही तास आधी सेनने माघार घेतल्याने चीनच्या तैपेईच्या पुढील फेरीतील प्रवेश निश्चित झाला.

पुरुष एकेरीत अन्य सामन्यांत हिंदुस्थानच्या प्रियांशू राजावतचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. जपानच्या सुनेयामाने प्रियांशूचा 21-13, 21-14 असा पराभव केला. महिला दुहेरीच्या सामन्यात हिंदुस्थानच्या अश्विनी आणि तनीषा जोडीने चीनच्या तैपेईच्या ली हसीन आणि तेग हेसनचा 21-19, 21-19 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह दोघींनी उपउपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. मिश्र दुहेरीत हिंदुस्थानच्या अश्विनी पोनप्पा आणि बी. सुमीत जोडीला पहिल्या फेरीतच मलेशियाच्या चेन जी आणि तेन जेसिका यांच्याकडून हार पत्करावी लागली.