मुंबईतील चार वॉर्डांत पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा

27

सामना ऑनलाईन,मुंबई

मुंबईतील रिक्त झालेल्या चार वॉर्डांत नगरसेवक पदासाठी पोटनिवडणूक घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठाने रिक्त झालेल्या या चार वॉर्डांत मतदान घेण्याबाबत घातलेली स्थगिती आज उठवली. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 28, 81, 76 आणि 32मध्ये मतदान होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत वॉर्ड क्र. 28 येथून काँग्रेस नगरसेवक राजपती यादव, वॉर्ड क्र. 81मधून भाजपचे मुरजी पटेल, वॉर्ड क्र. 76 येथून भाजपचे केसरबेन पटेल व वॉर्ड क्र. 32 येथून काँग्रेसतर्फे स्टेफी केणी हे नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. परंतु जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर निवडणूक आयोगातर्फे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. त्यामुळे या जागांवर पोटनिवडणूक घेण्यासाठी आयोगाकडून या जागांवर मतदार याद्या बनविण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या अधिसूचनेला पराभूत झालेले दुसऱ्या क्रमांकाचे काँग्रेस व शिवसेनेच्या एकूण चार उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटीकालीन खंडपीठासमोर या प्रकरणी झालेल्या गेल्या सुनावणीत न्यायालयाने मतदार याद्या जाहीर करण्याचा कार्यक्रम घ्या परंतु निवडणूक घेऊ नका, असे आदेश दिले होते. आज न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या चार वॉर्डांत पोटनिवडणूक घेण्यावर घातलेली बंदी उठवली.

न्यायालय काय म्हणाले…

रिक्त जागांवर पराभूत झालेल्या व दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची निवड सरसकट करता येणार नाही. कारण एखाद्या उमेदवाराची निवड करायची झाल्यास त्या उमेदवाराची चौकशी करणे अनिवार्य असते व या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो. त्यामुळे आयोगाला या चार जागांवर निवडणूक घेण्यापासून आम्ही रोखू शकत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या