लोकसभा निवडणुकीआधीच कमळ कोमेजू लागले, ‘इंडिया’चा भाजपला जोरदार धक्का

लोकसभा निवडणुकीआधीच कमळ कोमेजू लागले असून इंडिया आघाडीने आज भाजपला पहिला झटका दिला. सहा राज्यांत विधानसभेच्या 7 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीतील पक्षांनी 4 जागा जिंकत विजयाचा नारळ फोडला.

उत्तर प्रदेशातील घोसीची जागा भाजप नेत्यांनी प्रतिष्ठsची केली होती. येथे समाजवादी पार्टीचे उमेदवार सुधाकर सिंह यांनी भाजपचे उमेदवार दारा सिंह यांचा तब्बल 43 हजार मतांनी पराभव केला. पश्चिम बंगालमधील धुपगडीची जागा गमावण्याची नामुष्की भाजपवर ओढावली. या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार निर्मल चंद्र रॉय यांनी भाजप उमेदवार तापसी रॉय यांचा 4883 मतांनी पराभव केला. झारखंडच्या डुमरीत ‘इंडिया’ आघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवार बेबी देवी या जिंकल्या. त्यांनी ‘एनडीए’ च्या उमेदवार यशोदा देवी यांना धूळ चारली. केरळच्या पुथुप्पलीत काँग्रेसचे चंडी ऑमान यांनी सीपीआय (एम) चा पराभव केला. उत्तराखंडमधील बागेश्वर, त्रिपुरातील बॉक्सानगर आणि धनपूर या तीन जागा भाजपने जिंकल्या.

हाच देशाचा मूड, काँग्रेसने गोदी मीडियाला सुनावले

जर आज गोदी मीडिया नसता तर ‘इंडिया’ने ‘एनडीए’ला धूळ चारली, अशी हेडलाइन असती. सहा राज्यातील 7 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक झाली. 7 पैकी 4 जागा ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत. टीव्ही स्टूडिओमध्ये बसून राजकीय टिप्पणी करणारे देशातील जनतेचा मूड काय आहे हे ओळखू शकत नाहीत, असेच मी पुन्हा बोलणार आहे, असे काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म प्रमुख सुप्रिया श्रीनोत यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे म्हटले आहे.

लिटमस टेस्ट ‘इंडिया’ने जिंकली

तृणमूलचे खासदार साकेत गोखले यांनी आजच्या निकालातील महत्त्वाचा फरक ट्विटद्वारे अधोरेखित केला आहे. भाजपच्या तीनपैकी 2 जागा एकाच राज्यात, त्रिपुरात आहेत आणि इंडियाने मात्र पश्चिम बंगाल, झारखंड, उत्तर प्रदेश आणि केरळ अशा चार राज्यांत विजय मिळवला आहे. धुपगुडीत तर तृणमूलने भाजपाकडून जागा पुन्हा हिसकावून घेतली. बंगालच्या जनतेने मोदी यांना कसे साफ नाकारले आहे हे यातून स्पष्ट दिसून येते. प्रसारमाध्यमं ज्याला 2024 आधीची लिटमस टेस्ट म्हणत होती त्याचा निकाल – इंडिया 4 -3 भाजप. जुडेगा भारत, जितेगा इंडिया, असे त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

देशाचा कौल इंडियाला – ममता

धुपगुडी जिंकल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदारांचे आभार मानले. बंगालने आपला जनादेश दिला आहे. लवकरच ‘इंडिया’ला असलेला देशाचा कौलही दिसेल. ‘जय बांग्ला, जय भारत’ असा एल्गार त्यांनी पुकारला.

हा इंडियाचा विजय – अखिलेश

हा इंडियाचा विजय असून जुमलेबाजांना मतदारांनी नाकारले आहे, असे सांगत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मतदारांचे आभार मानले.