‘ABP’ नाही तर या देशातून सर्वाधिक शरणार्थी हिंदुस्थानमध्ये आश्रयाला येतात

1062

मोदी सरकारने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नुकतेच नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले. या विधेयकानुसार, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून (ABP) आलेल्या अल्पसंख्यांकांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्यात येणार आहे. मोदी सरकारने हा कायदा केल्यानंतर देशातील विविध भागांमध्ये याला प्रखर विरोध झाला. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन करण्यात आली. परंतु तुम्हाला माहिती आहे का मोदी सरकारने ज्या तीन देशातील शरणार्थींना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे त्या तीन देशातून नाही तर अन्य देशातून सर्वाधिक शरणार्थी हिंदुस्थानमध्ये येतात. संयुक्त राष्ट्र उच्चायुक्ताने (यूएनएचआरसी) याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे.

‘यूएनएचआरसी’च्या अहवालानुसार, हिंदुस्थानमध्ये सर्वाधिक शरणार्थी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश नाही तर चीनमधून येतात. त्यानंतर श्रीलंका आणि म्यानमारचा नंबर लागतो. यासह सर्वाधिक शरणार्थी असणाऱ्या देशांच्या यादीतही हिंदुस्थानचा नंबर बराच खाली आहे. जगभरात पाहायचे झाले तर सर्वाधिक शरणार्थी सीरियामध्ये (63,24,551) आहेत. त्यानंतर अफगाणिस्तान, दक्षिण सुडान, म्यानमार, सोमालिया देशांचा नंबर लागतो. हिंदुस्थानमध्ये 1,95,891 शरणार्थी आहेत असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच या अहवालामध्ये हिंदुस्थानचे सर्वाधिक शरणार्थी कोणत्या देशात आहेत हे देखील नमूद करण्यात आले आहे. हिंदुस्थानचे सर्वाधिक शरणार्थी अमेरिकेत (6110) आहेत, तर कॅनडा (1457) याबाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे.

शरणार्थी कोणाला म्हणतात?
हिंसाचार, युद्धजन्य परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या छळाचा सामना करताना देश सोडून इतर देशांमध्ये राहण्यास भाग पडणाऱ्या नागरिकांना शरणार्थी म्हणतात, असे यूएनएचआरसीने म्हटे आहे. परंतु शरणार्थींचा दर्जा मिळवण्याचीही एक प्रक्रिया आहे. हा दर्जा मिळवण्यासाठी त्या-त्या देशातील शरणार्थींच्या व्याख्येनुसार स्वत:ला सिद्ध करावे लागले. यासाठी शरणार्थींना त्या देशाच्या सरकारकडे आश्रयासाठी अर्ज करावा लागतो. जोपर्यंत हा अर्ज मंजूर केला जात नाही तोपर्यंत शरणार्थीचा दर्जा मिळत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या