राहुल, प्रियंका यांनी दंगली घडवल्या! अमित शहा यांचा गंभीर आरोप

611
amit-shah

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी जनतेची दिशाभूल करुन दंगली घडवल्या, असा गंभीर आरोप केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केला. या कायद्यामुळे कुणाचेही नागरिकत्व हिरावले जाणार नाही, अशी खात्रीही शहा यांनी यावेळी हिंदुस्थानातील अल्पसंख्याकांना दिली.

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडीयममध्ये आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शहा यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे हिंदुस्थानातील कुणाही अल्पसंख्यांकांचे नागरिकत्व हिरावून घेणार नाही. कुणालाही देशाबाहेर जावे लागणार नाही. हा कायदा शेजारील पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या तीन देशांमधून हिंदुस्थानात शरणार्थी म्हणून आलेल्यांना नागरीकत्व देण्यासाठी आहे, असेही शहा यावेळी म्हणाले. दरम्यान, 1984 मध्ये मोठया संख्येने शिख बांधवांची हत्या झाली. काँग्रेसच्या सरकारने त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. उलट मोदी सरकारने पीडितांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये नुकसानभरपाई दिली. तसेच जे दोषी होते त्यांना तुरुंगात टाकले असेही शहा यावेळी म्हणाले.

केजरीवालांवरही निशाणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीवरही त्यांनी तोफ डागली. अरविंद केजरीवाल यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांची दिशाभूल केल्याचा आरोपही शहा यांनी केला. एखादा जनतेची कायम दिशाभूल करू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्लीत भाजपाचीच सत्ता येईल असा विश्वासही शहा यांनी यावेळी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या