जामा मशिद पाकिस्तानात आहे का? आझादच्या अटकेप्रकरणी कोर्टाने दिल्ली पोलिसांना झापले

892

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान भीम आर्मिचा प्रमुख चंद्रशेखर आझाद याला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. या अटकेविरोधात मंगळवारी सुनावणी पार पडली. यावेळी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने दिल्ली पोलिसांना झापले असून विरोध प्रदर्शन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. तुमचे वर्तन असे आहे जसे काय जामा मशिद पाकिस्तानमध्ये आहे, असेही कोर्टाने म्हटले.

केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (सीएए) देशभरात आंदोलन झाली. अनेक ठिकाणी अजूनही आंदोलनं सुरु आहेत. यादरम्यान दिल्लीतील दरियागंज, सीलमपूर भागात जामा मशिदीबाहेर चंद्रशेखर आझाद यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखर आझाद याला अटक केली होती.

मंगळवारी तीस हजारी कोर्टाध्ये चंद्रशेखर आझाद याच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने पोलिसांनी आझादविरोधात सहारनपूरमध्ये दाखल केलेल्या एफआयआरची माहिती मागितली. तसेच आझादने आतापर्यंत कोणते आपत्तीजनक विधान केले आहे? तसेच कोणीही आंदोलन करू शकते, आंदोलन करणे अपराध श्रेणीमध्ये येते का? असा सवाल कोर्टाने दिल्ली पोलिसांना केला.

सरकारी वकिलांनी यावेळी नियमांचा दाखला देत धार्मिक संस्थांबाहेर आंदोलन करण्यास बंदी असल्याचे सांगितले. यावेळी कोर्टाने म्हटले की, तुम्हाला असे वाटते का की दिल्ली पोलीस एवढी मागास आहे की त्यांच्याकडे याचे काहीही रेकॉर्ड नसेल? अनेक छोट्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी पुरावे दाखल केले आहेत, मात्र या प्रकरणी का नाही? असा सवाल कोर्टाने केला. दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी यावेळी कोर्टाच्या हे निदर्शनास आणून दिले की, आंदोलनादरम्यान घेण्यात आलेल्या ड्रोन फुटेजमध्ये चंद्रशेखर आझाद गर्दीला भडकावण्यासाठी भाषण देताना दिसत आहे. यावर पलटवार करताना चंद्रशेखरच्या वकिलांनी असे कोणतेही भाषण दिले नसल्याचे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या